रत्नागिरी:- शासनाने वृत्तपत्रांची छपाई बंद केलेली नाही तसेच विक्रीवरदेखील बंदी घातलेली नाही. त्यामुळे पेपर स्टॉल जोरजबरदस्तीने बंद करू नका, छापलेली वृत्तपत्रे मग करणार काय? असा सवाल करीत उद्या शनिवारपासून जिल्ह्यात पहाटेपासून सकाळी १० वाजेपर्यंत वृत्तपत्र विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकार्यांना देऊन तत्काळ त्याबाबतचे लेखी आदेश काढावेत असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राज्यात नव्याने निर्बंध लागू झाल्यानंतर केवळ अत्यावश्यक सेवेत मोडणार्या आस्थापनांना या निर्बंधातून वगळण्यात आले. त्यामध्ये वृत्तपत्रांचादेखील समावेश आहे. असे असताना गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात वृत्तपत्र विक्रेत्यांना विक्री करण्यास बंद भाग पाडण्यात आले. शासनाच्या आदेशात असा कोणताही उल्लेख नसताना प्रशासनाने वृत्तपत्र विक्रीवर निर्बंध आणले. त्यामुळे संतप्त प्रतिक्रीया वाचकांनीच व्यक्त केल्या.
याची गंभीर दखल घेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकार परिषद घेऊन वृत्तपत्र विक्रीसाठी मुभा दिली जाईल असे जाहीर केले. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे आदी उपस्थित होते.