Saturday, June 13, 2026
spot_img
Home गुहागर वीज वाहिनीचा धक्का लागून गायीचा मृत्यू

वीज वाहिनीचा धक्का लागून गायीचा मृत्यू

गुहागरमध्ये महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका

गुहागर:- तालुक्यातील धोपावे बंदर येथे महावितरणच्या नवीन भूमिगत वीज केबलच्या डीपीमधून विद्युत प्रवाह उतरल्याने एका गाईचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास घडली.

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, धोपावे बंदर परिसरात नुकतेच भूमिगत वीज केबल टाकण्याचे काम करण्यात आले आहे. मात्र हे काम अत्यंत निष्काळजीपणे करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. संबंधित डीपी गावातील वाडी-वस्तीच्या अगदी जवळ असून या ठिकाणी नागरिक, वाहने तसेच जनावरांची सतत वर्दळ असते.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, केबल सुरक्षितपणे जमिनीखाली टाकण्याऐवजी केवळ नावालाच पाईपचा वापर करण्यात आला असून अनेक ठिकाणी केबल जमिनीवर उघडी पडलेली आहे. यामुळे परिसरात मोठा धोका निर्माण झाला आहे. याच निष्काळजीपणाचा फटका आज एका गाईला बसला असून शॉक लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यात अशा प्रकारची दुर्घटना एखाद्या व्यक्तीसोबत घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. संबंधित विभागाने तात्काळ घटनास्थळी पाहणी करून दोषी ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच उघड्यावर असलेल्या केबल सुरक्षितपणे जमिनीखाली टाकाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.