पावस:- गावखडी-भंडारवाडी येथे सिंगल बॅरल काडतूसची बंदूक व रिकामी काडतूस बाळगल्या प्रकरणी प्रौढाविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश दयाळ पेटकर (४५, रा. भंडारवाडी, गावखडी, रत्नागिरी) असे संशयित प्रौढाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. ६) दुपारी दोनच्या सुमारास भंडारवाडी येथील संशयिताच्या घराच्या मागील बाजूस उघड्यावर निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयिताच्या घराच्या मागील बाजूस विनापरवाना सिंगल बॅरल व रिकामे काडतूस बाळगलेल्या स्थितीत सापडला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हेड कॉन्स्टेबल दिपराज पाटील यांनी पुर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पुर्णगड पोलिस अमंलदार करत आहेत.