रत्नागिरी:- राज्याच्या समुद्र क्षेत्रात म्हणजेच १२ नॉटीकल मैल अंतरापर्यंतच्या समुद्रात मासेमारी करण्यासाठी एकाही पर्ससीन, मिनी पर्ससीन नौकेकडे मासेमारी परवाना नाही. तरीही काळबादेवी किनाऱ्यासमोर ४ ते ५ नॉटीकल मैल अंतरात मासेमारी करणाऱ्या चार मिनी पर्ससीन नौका सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाचे शिवराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील गस्ती पथकाने पकडल्या आहेत. यातील तीन नौका मिरकरवाड्यातील तर एक नौका काळबादेवीतील आहे. अवैध मासेमारी करणाऱ्या पर्ससीन नौकांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त जे.डी.सावंत यांनी सांगितले.
पर्ससीन नेट मासेमारी १ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. परंतु या पर्ससीन नेट नौकाना राज्याच्या सागरी क्षेत्रात मासेमारी करण्याचा परवाना नाही. सुमारे ३०५ पर्ससीन नौकाना एक्सेस पास देण्यात आले असून या नौकांना १२ नॉटीकल मैल बाहेरच्या समुद्रात मासेमारी करण्याची परवानगी आहे. परंतु काही पर्ससीन नौका १२ नॉटीकल मैलाच्या आत म्हणजेच राज्याच्या सागरी क्षेत्रात मासेमारी करत असल्याच्या तक्रारी पारंपारिक मच्छिमार नेत्यांकडून येवू लागल्या. या पार्श्वभूमीवर समुद्रातील गस्त परिणामकारकपणे होण्यास मदत झाली.
शारदा गस्ती नौकेने सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी आपल्या पथकासोबत समुद्रात गस्त घालत असताना काळबादेवी येथे ४ मिनी पर्ससीन नौका मासेमारी करताना मिळून आल्या. यामध्ये मिरकरवाड्यातील सर्फराज नजीर पावसकर यांची रिया-सारिया, अस्लम हसन दर्वे यांची उबेदुल्ला अदनान, मुस्सदीक अब्दुल हमीद जयगडकर यांची आयरा झैनाब आणि काळबादेवी येथील धनंजय बिर्जे यांची ध्रुवी नौका समुद्रात मासेमारी करताना मिळून आल्या. अगदी तडीवर म्हणजे ४ ते ५ नॉटीकल मैलावरच मासेमारी करणाऱ्या नौकाना पाडण्यात आल्या.









