विधवा प्रथा बंदी पाठोपाठ नाणीजमध्ये आझादी का अमृत महोत्सवातही नवा पायंडा 

विधवा महिला, माजी सैनिक, निवृत्त कर्मचाऱ्याच्या हस्ते ध्वजरोहण

रत्नागिरी:- विधवा प्रथा बंदीचा ठराव नाणीज ग्रामपंचायतीने काही दिवसांपुर्वी केला होता. त्यानंतर आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत ग्रामपचायंतीमध्ये 13 ऑगस्टला केलेले ध्वजारोहण गावातील विधवा महिलेच्या हस्ते केले. त्यानंतर 14 ला माजी सैनिकाच्या हस्ते तर 15 ऑगस्टला सेवा निवृत्त पाणी वितरण कर्मचार्‍याला मान देण्यात आला.

नाणीज ग्रामपंचायतीचे सरपंच गौरव दिलीप संसारे यांच्या संकल्पनेतून ध्वजरोहण कार्यक्रम तिन दिवस राबविण्यात आला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त हे कार्यक्रम घेण्यात आले. विधवा महिलांना समाजात मानाचे स्थान मिळावे म्हणून श्रीमती प्रतिभा पांडुरंग रेवाळे यांच्या हस्ते 13 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. नाणिज गावात विधवा अनिष्ट प्रथा निर्मूलन करण्यासाठी सरपंच गौरव संसारे यांनी विशेष मेहनत घेतली होत. विधवा महिलांना मान-सन्मान देण्याचे कार्य ते करत आहेत. 15 ऑगस्टला मुख्य कार्यक्रमावेळी सरंपचांनी ध्वजारोहणाचा मान सेवानिवृत्त झालेले कर्मचारी अनंत गोविंद हतपले यांना दिला. त्यांनी नाणीज गावाच्या सेवेसाठी 35 वर्ष अहोरात्र मेहनत घेतली होती. या माध्यमातून आगळा वेगळा आदर्श घालूनदिलाआहे. याबाबत ग्रामपंचायत सदस्य विनायक शिवगण म्हणाले, नाणीज ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव केला. या प्रथा बंद करत असतानाच विधवांना समाजात स्थान मिळवून देणेही तेवढेच गरजेचे आहे. त्यासाठी ग्रामपचायंतीला भेट देणार्‍या वरीष्ठ अधिकार्‍यांचे औक्षण करुन स्वागत विधवा महिलांच्या हस्ते करण्यात आले. या माध्यमातून समाजातील चालीरिती बाजूला काढण्याचा आमचा प्रयत्न आहे.