विद्यार्थ्यांच्या भाषा समृद्धीसाठी ध्यास व्याकरणाचा उपक्रम 

जिल्हा परिषद घेणार ५० तज्ज्ञ शिक्षकांची मदत

रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातर्फे समग्र शिक्षा अभियानांतर्गत ४ थी ते ७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी ध्यास व्याकरणाचा, भाषा समृद्धीचा हा उपक्रम सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये चारही भाषांचे स्वतःचे असे व्याकरणाचे पुस्तक बनवले जाणार असून त्यासाठी ५० तज्ज्ञ शिक्षकांची मदत घेतली जाणार आहे. या उपक्रमाची येत्या काही दिवसात प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

तत्कालीन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांच्या संकल्पनेतून प्राथमिक शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम हाती घेण्यात आले. यामध्ये ग्रामीण भागातील मुलांची भाषा सुधारण्यासाठी त्यांना भाषेवर प्रभुत्व मिळावे या उद्देशाने ध्यास व्याकरणाचा, भाषा समृद्धीचा या उपक्रमाची सुरवात केली आहे. शास्त्रशुद्ध व निटनेटकी भाषेचा वापर दैनंदिन जीवनात महत्त्वाचा आहे. त्याकरिता शाळेतील विद्यार्थ्यांना भाषेच्या व्याकरणाची माहिती मिळणे आवश्यक आहे. जे बोलतो, लिहितो ते व्यवस्थित, आकर्षक शुद्ध ठेवण्याच्यादृष्टीने व्याकरणाची मदत घेता येते. त्यासाठी ४ थी ते ७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. यामध्ये मराठी, इंग्रजी, हिंदी व उर्दू भाषांच्या व्याकरणाचा समावेश आहे. यामध्ये मराठी, इंग्रजी, हिंदी व उर्दू भाषेमधील व्याकरणाचा समावेश उपक्रमात केला आहे. सर्वप्रथम चारही भाषांचे एकूण ५० तज्ञ शिक्षक निवडण्यात येणार आहेत. त्या शिक्षकांचे एक दिवशीय प्रशिक्षण जिल्हा स्तरावर घेण्यात येईल. प्रत्येक विषयासाठी १० असे प्रमाण ठेवून प्रत्येक शिक्षकाला इयत्तांचे वितरण केले जाईल. प्रत्येकाला 3 आठवड्यांचा कालावधी देऊन व्याकरणाशी संबंधित कच्चा मसुदा तयार करण्यास सांगितला जाईल. सर्वांनी तयार केलेले व्याकरणाची सर्व प्रकरण फेरपडताळणी करण्यात येणार आहे. त्यातील त्रुटी दुरुस्त करुन घेण्यात येतील. फेरपडताळणी झाल्यानंतर चारही भाषांचे स्वतःचे असे व्याकरणाचे पुस्तक तयार होईल. ध्यास व्याकरणाचा, भाषा समृध्दीचा या शिर्षकाखाली तयार झालेले प्रत्येक इयत्तेचे पुस्तक शाळांपर्यंत पोहचवण्यात येईल. ते पुस्तक संबंधित इयत्तेच्या अभ्यासक्रमाशी संबंधित असलेल्या विद्यार्थ्यांना खूपच मार्गदर्शक ठरेल असेच बनविण्यात येणार आहे. या पुस्तकाचा वापर करून सध्याच्या काळात व्याकरणाकडे होणारे दुर्लक्ष पूर्णतः बाजूला जाऊन भाषा समृध्द कशी होईल यावर शिक्षण विभागाकडून भर दिला आहे.