विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला डंपरची धडक ; विद्यार्थ्यांसह रिक्षा चालक जखमी

रत्नागिरी:- शहरानजीकच्या कदमवाडी-मजगांव रस्त्यावर अज्ञात डंपर चालकाने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला धडक दिली. या अपघात एका विद्यार्थ्यासह रिक्षा चालक जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. विद्यार्थी रियान सावकार व रिक्षा चालक जाहीदअली अब्दुलरहिम धामस्कर (वय ५०, रा. मजगाव, रत्नागिरी) अशी जखमींची नावे आहेत. ही घटना सोमवारी (ता. १३) दुपारी चारच्या सुमारास मजगाव-कदमवाडी रस्त्यावर घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रिक्षा चालक जाहिदअली धामस्कर हे रिक्षा (क्र. एमएच-०८ एक्यू ७१६८) मधून विद्यार्थी शोएब सावकार, रियान सावकार, महमद पेवेकर यांना शहरातील मिस्त्री हायस्कूल येथून बसवून रत्नागिरी ते मजगाव असे जात असताना कदमवाडी-मजगाव येथे आले असता मजगावहून रत्नागिरी येणाऱ्या डंपरने रिक्षाला धडक दिली. या अपघातामध्ये रिक्षा चालक जाहीदअल्ली धामस्कर व रियान सावकार हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.