रत्नागिरी:- गतवर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी झाला. त्यामुळे अनेक धरणातील पाण्याच्या साठ्यात वाढ झालेली नाही. उलट तापमान वाढ आणि पाण्याची मागणी यामुळे धरणातील पाणीसाठे तळाला गेले आहेत. अनेक धरणांच्या पाणी साठ्यात कमालीची घट झाली असून नद्या कोरड्या पडत आहेत.
अनेक गावे आणि वाड्यावस्त्यांना पाण्यासाठी टँकरची वाट पहावी लागत आहे. कोकण विभागातही जलसंचय खालवला असून कोकणातील धरणात सध्या 39.94 टक्के इतका पाणीासाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत कोकणातील धरणसाठा अन्य विभागाच्या तुलनेत अव्वल होता. मात्र यामध्ये यावर्षी 6.10 टक्क्यांची घट निर्माण झाली आहे.
गेल्या वर्षी कमी पडलेल्या पावसामुळे या वर्षी राज्यातील अनेक धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. अनेक धरणातील पाणी फक्त पिण्यासाठी आरक्षित करण्यात आल्याने पीक करपले आहे. यादरम्यान राज्यातील सर्व 2994 धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे.
जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार शुक्रवारी राज्यातील सर्व 2994 धरणातील पाणीसाठ्यात गेल्या वर्षी पेक्षा 8.41 टक्क्यांची घट झाली आहे. सध्या या सर्व धरणांमध्ये 32.36 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. तर सर्वात कमी पाणीसाठा छत्रपती संभाजी नगर विभागात असून येथे फक्त 15.88 टक्केच पाणी शिल्लक आहे.
धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने राज्यातील सहा विभागातील 1,834 गावे आणि 4,434 वाड्यांवर 2320 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
यात सर्वाधिक टँकर मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगरमध्ये फिरत असून येथे 527 टँकर जिल्हाभर फिरत आहेत. छ. संभाजी नगरमधील 345 गावांसह 51 वाड्यावस्त्यांमध्ये सध्या तीव्र पाणी टंचाई आहे. याखालोखाल जालन्यात 358 टँकरने पाणीपुरवठा सुरू असून बीडमध्ये 199 टँकरने दररोज 162 गावे आणि 126 वाड्यांना पाणी पुरवणे सुरू आहे.
एकीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या तीव्र पाणीबाणी दिसत असून नागरीक हैराण झाले आहेत. टँकरने पाणीपुरवठा वाढवावे अशी मागणी वाढत आहे. मात्र निवडणुकांच्या रणधुमाळीत राज्यकर्त्यांसह प्रशासनाचे पाणी टंचाईकडे दुर्लक्ष होत आहे.
गतवर्षी कोकणात अव्वल असलेल्या जलसंचयात यावर्षी नऊ टक्क्यांची घट झाली आहे. राज्यातील सहा महसूल विभागांतील धरणांची स्थिती पाहता सर्व मोठ्या अशा 138 धरणांमध्ये एप्रिलच्या मध्यावधीत 32.11 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. जो गेल्या वर्षी 39.44 टक्के होता. विभागनिहाय नागपूर विभागात 44.65, अमरावती 41.69, छत्रपती संभाजीनगर-17.09, नाशिक – 34.13, पुणे – 30.01 आणि कोकण – 39.94 टक्के इतका पाणीसाठा आहे. गतवर्षी कोकणात या कालावधीत 45.13 टक्के पाणी साठा होता