रत्नागिरी:- एसटी प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा प्रत्यय सध्या तालुक्यातील नांदीवडेवासीयांना अनुभवायला मिळत आहे. शाळा दुरुस्ती कारणास्तव रात्रवस्तीची एसटी नेणाऱ्या चालक, वाहकांना देण्यात आलेल्या खोलीत शाळेचे सामान ठेवल्याने चालक, वाहकांची वस्तीची गैरसोय झाली. वस्तीची खोली काढून घेतल्याच्या रागातून एसटी प्रशासनाने नांदीवडेत जाणाऱ्या सर्व एसटी बसेस बंद करण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला. चर्चेतून मार्ग काढण्याऐवजी सर्व एसटी बसेस बंद करण्याचा घेतलेल्या निर्णया विरोधात नांदीवडेवासीय आक्रमक झाले असुन या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच आर्या गडदे यांनी दिला आहे.
नांदीवडे हे तालुक्याच्या एका टोकाला असलेले गाव आहे. शहराकडे येण्यासाठी इथल्या ग्रामस्थांना एसटी हाच सर्वात महत्वाचा आणि स्वस्त पर्याय आहे. वर्षानुवर्षे इथले ग्रामस्थ एसटीनेच प्रवास करत असताना अचानक या गावात जाणाऱ्या एसटी बसेस बंद करण्यात आल्या आहेत.
नांदीवडे गावात नियमित फेऱ्यांसोबत रात्र वस्तीची बस सोडण्यात येते. रात्रवस्तीची बस घेऊन जाणारे चालक आणि वाहक हे नांदीवडे येथील शाळे नजीकच्या खोलीत वस्ती करतात. सध्या या शाळेच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. दुरुस्ती सुरू असल्याने शाळेतील कॉम्प्युटर आणि इतर महत्वाचे सामान चालक, वाहक रहात असलेल्या खोलीत ठेवण्यात आले आहे. या कारणास्तव वस्तीची एसटी घेऊन जाणाऱ्या चालक वाहक यांच्या वस्तीची गैरसोय झाली. हा प्रश्न एसटी प्रशासनाने चर्चेतून सोडवणे अपेक्षित असताना हुकूमशाही कारभाराचा नमुना दाखवत नांदीवडेत जाणाऱ्या सर्व फेऱ्या बंद केल्या आहेत.
एसटी कर्मचारी वस्ती करत असलेल्या खोलीत प्रचंड अस्वछता असल्याच्या तक्रारी देखील ग्रामस्थांनी केल्या आहेत. खोलीत अर्धवट खाल्लेले अन्न, कचरा तर कधी-कधी दारूच्या बाटल्या देखील सापडल्या असुन हा कचरा स्वच्छ करण्याचे काम स्थानिक ग्रामस्थांनाच करावे लागते. अशा परिस्थितीत देखील ग्रामस्थांनी एसटी प्रशासनाला सहकार्य केले. मात्र ग्रामस्थांची अडचण लक्षात न घेता एसटी फेऱ्या बंद केल्याचा संताप नांदीवडे ग्रामस्थांमध्ये आहे.
मागील तीन दिवसांपासून एसटी बसेस बंद असल्याने नांदीवडेतील ग्रामस्थांचे रत्नागिरी शहराकडे येण्याचे पुरते हाल झाले आहेत. शहराकडे येणे शक्य न झाल्याने अनेकांची सरकारी कामे रखडली आहेत. काहींनी तर खासगी वाहने करत आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. एसटी प्रशासनाने घेतलेल्या या निर्णया विरोधात नांदीवडे वासीयांमध्ये संतापाचे वातावरण असून एसटी सेवा पूर्ववत न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच आर्या गडदे यांनी दिला आहे.