वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी दोन कोटी 51 लाखांचा निधी

रत्नागिरी:- वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी दोन कोटी 51 लाख रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहे. राज्यात विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गात अनेक जाती, जमाती असून अद्यापही भटकंती करून स्थलांतरित स्वरूपाचे जीवन जगत आहेत.

रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूर तालुक्यात अनेक धनगरवस्त्या व इतर वस्त्या असून या वस्त्यांमध्ये अनेक वर्षांपासून हे लोक वास्तव्य करीत आहेत. बहुसंख्य वस्त्या दुर्गम भागात स्थायिक झालेल्या आहेत. या प्रवर्गातील समाज ज्या ठिकाणी वास्तव्यास आहे, त्याच ठिकाणी या समाजाला स्थिर जीवन जगता यावे याकरिता त्यांना अत्यावश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ही कामांना मान्यता देण्यात आली आहे. या वस्त्यांसाठी विविध विकास कामांसाठी दोन कोटी 51 लाख निधी मंजूर झालेला आहे.
वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत 2024-25 साठी या कामांना मान्यता मिळाली असून, त्यासाठी संबंधित यंत्रणेकडे निधी वितरित करण्यात आल्याची माहिती आहे.