वळके बौद्धवाडीच्या दफनभूमित बीएसएनएल टॉवर उभारण्यास स्थानिकांचा विरोध

मोजणीसाठी आलेल्या पथकाला स्थानिकांनी धरले धारेवर

रत्नागिरी:- तालुक्यातील पाली येथील वळके बौद्धवाडीच्या दफन भूमित अनधिकृत मोबाईल टॉवर उभारण्यास स्थानीक जनतेचा विरोध आहे. शुक्रवारी (23 जून 2023) BSNL कंपनीचे अधिकारी मोजणी करण्यासाठी पथक त्याठिकाणी आले होते. मात्र स्थानिकांनी मोजणी, सर्वेक्षणाच्या कामासाठी प्रखर विरोध दर्शवत आलेल्या अधिकाऱ्यांना परतून लावले.

असंख्य गावात आजही अंत्यविधीसाठी स्वतंत्र अशा जागा नसल्यामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. अनेकवेळा वंशपरंपरागत पद्धतीने ज्या जागेवर दहन किंवा दफन विधी केला जातो. त्या स्मशानभूमीची जागा बऱ्याच गावांमध्ये खाजगी मालकीची असल्याने वादविवाद देखील झालेले पाहायला मिळतात. किंवा स्वतंत्र दफनभूमी मिळावी यासाठी अनेक गावांना वर्षांनुवर्षे झगडावे लागते. मात्र बौद्धवाडीची दफनभूमि हि स्वतंत्र जागा शासनाच्या मालकीची आहे.

आरक्षित नसलेल्या जागा उपलब्ध करून द्यावा असा शासनाचा आदेश आहे. मात्र आरक्षित जांगांवर अतिक्रमण करून शासनच आपला आदेश मोडित काढत असेल तर आम्ही बोलू नये का? असा सवाल स्थानिक ग्रामस्थ मुकुंद सावंत यांनी अधिकाऱ्यांना केला. तसेच ही जागा देखील कमी पडत असल्याचे स्थानिकांनी अधिकाऱ्यांनी सांगितले. गावात इतर ही ठिकाणी शासन मालकीच्या जागा आहेत. त्याठिकाणी टॉवर उभारण्यास स्थानिकांची कोणत्याही प्रकारे विरोधाची भूमिका नसेल असे मोजणी पथकातील अधिकाऱ्यांना स्थानिकांनी सांगीतले. यानंतर अधिकाऱ्यांनी उपस्थित जनतेचा रोष पाहून पथकातील अधिकाऱ्यांनी सहमती दर्शवली. व कोणतेही काम सुरू केले नाही.

स्थानिकांचे शासन दरबारी पत्रव्यवहार

बौद्धवाडीची दफनभूमि हि स्वतंत्र जागा शासनाच्या मालकीची असून या ठिकाणी कोणत्याही कंपनीचा टॉवर किंवा अनधिकृत बांधकामे होण्यास स्थानिकांचा प्रखर विरोध आहे. याबाबत स्थानिकांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहारही केला आहे. त्यावर कोणताही प्रतिसाद अद्याप आलेला नाही. शासन दरबारी पत्रव्यवहार सुरू असतानाही मोजणीचे काम हाती कसे काय घेतले? असा सवाल नागरिकांनी यावेळी उपस्थिती केला. या विषयासंदर्भात शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा देखील सुरू असल्याचे स्थानिक नागरिकांनी यावेळी सांगितले आहे.

लेखी स्वरूपात घेतली नागरिकांची भूमिका

जमिनीची मोजणी, सर्वेक्षण करण्यासाठी BSNL कंपनीचे अधिकारी, शासकीय अधिकारी सरपंचासह कर्मचारी दफन भूमीच्या ठिकाणीं दाखल झाले. यावेळी विरोध दर्शविण्यासाठी स्थानिक नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिकांनी एकावर एक प्रश्न विचारत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. स्थानिकांचा विरोध पाहून अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात नागरिकांची बाजू घेतली व तिथून काढता पाय घेत निघून गेले.

जो शासन निर्णय घेईल तो बंधनकारक: सरपंच

या प्रकरणासंदर्भात सरपंच उत्तम सावंत यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी असे सांगितले की, ग्रामसभेत जे ठरेल त्या अनुषंगाने सरपंच आपले कामकाज करत असतो. शासनाने ग्रामपंचायतीला दिलेल्या पत्रकाद्वारे आम्ही या भागातील शासनाच्याच पाच जागा दाखवल्या होत्या. यापैकी वरिष्ठांनी अपेक्षित असलेल्या जागेचे कागदपत्रे मागविले त्यानुसार त्या जागेचे कागदपत्रे देण्यात आले. वस्तुस्थिती बघता स्मशानभूमी बौद्धवाडीसाठी आहे अशी कुठेही नोंद नाही. ही स्मशानभूमी गावासाठी आहे. मात्र स्थानिकांनी घेतलेली हरकत आपण शासनाला कळवनार आहोत. तसेच शासन जो निर्णय घेईल तो सरपंच या नात्याने मला बंधनकारक आहे.