रत्नागिरी:- जिल्ह्यात मातामृत्यूचे प्रमाण कमी असले तरीही बालमृत्यूचे प्रमाण चिंता वाढवणारे आहे. वर्षभरात जिल्ह्यात 137 बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा आरोग्य विभागाकडे आहे. तर प्रसूतीदरम्यान 2 मातांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षभरातील ही आकडेवारी असून, जिल्हा आरोग्य यंत्रणेने बालमृत्यू दर कमी करण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत.
साधारण बालकांचा मृत्यूदर दरहजारी 10 आहे. दोन वर्षांमध्ये तो फार कमी झालेला नाही; परंतु महाराष्ट्राच्या दरापेक्षा जिल्ह्याचा मृत्यूदर कमी असल्याचा दावा आरोग्य यंत्रणेने केला आहे.
महाराष्ट्र राज्यातील अर्भक मृत्यूदर कमी झाला आहे. स्वच्छता, पायाभूत सुविधा प्रकल्प, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानात राष्ट्रीय स्तरावरील महाराष्ट्राने चमकदार कामगिरी केली आहे. त्यात आरोग्य विभाग सातत्याने अर्भक आणि बालमृत्यू रोखण्यासाठी उपाययोजना करत असल्यामुळे बालमृत्यूदरात घट होत आहे; परंतु रत्नागिरी जिल्ह्याचा बाल मृत्यूदर फारसा कमी होताना दिसत नाही. गेल्या दोन वर्षांमध्ये हा मृत्यूदर जैसे थेच आहे. 2022-23 मध्ये 180 बालकांचा मृत्यू झाला होता. 2023-24 मध्ये 137 बालकांचा मृत्यू झाला आहे.
बालमृत्यू आणि मातामृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभाग अनेक उपाययोजना करत आहे. अन्न व पोषण स्वच्छ व आरोग्यदायी बनवण्यासाठी सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. माता व बाल आरोग्य तसेच लसीकरण हे ध्येय समोर ठेवून सार्वजनिक आरोग्यसेवा पुरवल्या जातात. संसर्गजन्य व असंसर्गजन्य तसेच स्थानिक रोगांच्या साथीचा प्रतिकार करण्यासाठी उपाय सुचवले जात आहेत. गर्भधारणेवेळी लवकर प्रसूतीपूर्व काळजी घेणे, संपूर्ण गर्भधारणेदरम्यान आरोग्यसेवा प्रदात्याला भेट देणे आणि प्रसूतीनंतरच्या भेटींना उपस्थित राहणे. यामुळे गर्भधारणेशी संबंधित गंभीर गुंतागूंत टाळण्यास आणि त्यावर उपचार करण्यास मदत होऊ शकते; परंतु या उपाययोजना करूनही बालमृत्यू रोखण्यासाठी अपेक्षित यश आले नाही. सध्या देशाचा बाल मृत्यूदर दरहजारी 10 इतका आहे.