वरवडेत पोवार कुटुंबाच्या घराकडे जाणारी पायवाट रोखली; ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष

रत्नागिरी:- वरवडे (ता. जि. रत्नागिरी) येथे घराकडे जाणारी पायवाट अडवून जाणूनबुजून त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. वरवडे गावचे सरपंच विराग पारकर यांच्या सांगण्यावरून आपल्या कुटुंबाला नाहक त्रास दिला जात असल्याचा तक्रार अर्ज कामिनी केशव पोवार यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे देण्यात आला आहे.

कामिनी पोवार यांनी दिलेल्या निवेदनानुसार पोवार कुटूंब राहत असलेल्या घराकडे येणा-या रस्त्यावर शेजारी राहणार्‍या मनोज पोवार, सुधाकर डोर्लेकर, चैतन्य कदम, राजू रमेश कदम, आशिष रमेश कदम, अभिषेक कदम यांनी पक्की भिंत बांधली आहे. त्यामुळे पोवार यांच्या घराकडे ये-जा करण्यास अडथळा निर्माण होत आहे. हे कृत्य त्यांनी जाणूनबुजून केले आहे. याबाबत शेजार्‍यांशी संवाद साधला असता त्यांनी आमच्याशी उर्मटपणाची भाषा केली. तसेच पोवार कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत 11 मे 2023 रोजी जयगड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. या घटनेमुळे घरातील लोकांनी धसका घेतला आहे. तसेच सर्व कुटूंब भितीदायक वातावरणात राहत आहे.

ग्रामपंचायतीकडूनही त्रास दिला जात असून घरातील सांडपाणी निचरा करण्यासाठी पाईपलाईन स्वःखर्चाने टाकावी असे सांगितले जात आहे. समुद्राशेजारी शोषखड्डा पाडून सांडपाण्याचा निचरा करणारी पाईपलाईन टाकण्याची परवानगीही ग्रामपंचायतीकडून देण्यात आलेली नाही. पावसाळा जवळ येत असल्याने सरंपचांना याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडूनही पोवार कुटूंबाला योग्य वागणुक मिळालेली नाही. याउलट सरपंच पारकर यांनी कामिनी पोवार यांच्या पतीलाच अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत धमकवल्याचा आरोप पोवार यांनी केला आहे. सर्व बाजूने कुटुंबाची कुचंबणा होत असून यावर तोडगा काढावा अशी मागणी कामिनी पोवार यांनी केली आहे.