रत्नागिरी:- मानवी वस्तीमध्ये सपरटणार्या प्राण्यांसह विविध जंगली जनावरे वारंवार येत असतात. त्यामुळे भितीचे वातावरण तयार होते. त्या प्राण्यांना सुरक्षित पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी वन विभागाकडून सुरु केलेल्या मोहीमेत आतापर्यंत सुमारे दिडशेहून अधिक सापासह अन्य प्राण्यांना जीवनदान दिले आहे.
वन विभागाकडून सुरु केलेल्या टोल फी क्रमांकावर नागरिकांकडून संपर्क साधला जात आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी शहर आणि आजूबाजूच्या मानवी वस्तीत आलेल्या सापांना वनविभाग सुरक्षित त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करते. गेल्या दोन दिवसात रत्नागिरी तालुक्यातील सिध्दीविनायक नगर, कोळंबे सडा लक्ष्मी नगर, मिरजोळे, जाकिमिर्या, क्रांतीनगर आदी भागात निदर्शनास आलेल्या २ घोणस, १ नाग, १ दिवाड, २ धामण व १ अजगर प्रजातीच्या एकूण ७ साप व १ घोरपडीचे वनविभागाकडून बचावकार्य केले. या बचावकार्यात वनपाल पाली न्हानू गावडे, वनरक्षक पी. एस. साबणे यांच्यासह रोहन वारेकर, योगेश शिंदे, विघ्नेश अनुभवने, सुरेश लांजेकर व सुकांत पाडाळकर यांची मदत झाली. या प्राण्यांना ताब्यात घेवून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. विभागीय वन अधिकारी दिपक खाडे यांच्यासह सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख, परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार यांनी नागरिकांनी टोल फ्री क्रमांकाचा वापर करुन प्राण्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.