रत्नागिरी:- आतापर्यंत शाळा, ग्रामपंचायत कार्यालय किंवा इतर सरकारी इमारतींमध्ये मतदान केंद्रे निश्चित केली जात होती. आगामी लोकसभा निवडणुकीत प्रथमच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे निश्चित करण्यात येणार आहेत. त्यानुसार शहरीभागातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे असणार आहेत.
शहरी भागात मतदानाची टक्केवारी वाढावी, याकरिता यंदा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हे पाऊल उचलण्यात येणार आहे. अधिकाधिक मतदान होण्यासाठी निवडणूक आयोगाकडून अनेक उपक्रम, योजना, स्पर्धा, कल्पना राबविल्या जातात. तसेच मतदानाच्या दिवशी घरापासून दोन किलोमीटर अंतराच्या आत मतदान केंद्र निश्चित करून मतदान केंद्रांवर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र, शहरी मतदारांकडून मतदानाच्या दिवशी निरूत्साह दिसून येतो. सुशिक्षित मतदार मतदानाच्या दिवशी सुटी असल्याने बाहेर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
लोकसभा आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत शहरी भागात मतदानाचा टक्का कमी असतो. महानगरांमध्ये 50 टक्क्यांच्या आसपास मतदान होते.
या ठिकाणचे मतदान वाढावे, या मतदारांना घराजवळच मतदान केंद्र असल्यास ते मतदान करतील, या आशेने केंद्रीय निवडणूक आयोगाने सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने अशा मोठ्या सोसायट्यांच्या आवारातच मतदान करण्याची व्यवस्था उपलब्ध कुरन देण्याची चाचपणी करणारक आहे.