पाणीयोजनेची पाइपलाइन; वाहतूक एकेरी
रत्नागिरी:- कडक लॉकडाउनचा पालिकेने पुन्हा फायदा घेत शहरातील मुख्य रस्ता खोदून पाणीयोजनेची पाइपलाइन टाकण्यास सुरवात केली आहे. ठेकेदाराने मोठ्या प्रमाणात जेसीबी लावून युद्धपातळीवर हे काम सुरू केले आहे. त्यामुळे शहरातील तुरळक वाहतूकही आता एकेरी करावी लागणार आहे.
शहरामध्ये गेल्या तीन वर्षांपासून सुधारित पाणीयोजनेचे काम सुरू आहे. ठेकेदाराला वारंवार मुदत देऊनही हे काम अजून ५० टक्क्यांपर्यंत गेलेले नाही. यावरून भाजपचे विरोधक आणि शिवसेनेचे सत्ताधारी यांच्यात जोरात कलगीतुरा सुरू होता. ते आता काहीसा थांबला आहे. ७४ कोटीच्या या पाणीयोजनेचे शिळ जॅकवेल ते साळवी स्टॉप जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. नवीन तीन विद्युतपंपही बसविण्यात आले आहेत. त्यामुळे चांगल्या दाबाने पाणी येत असून कमी वेळात टाकी भरत आहे. परंतु योजनेचे शहरामध्ये जलवाहिन्या टाकण्याचे काम झाले नव्हते. सत्ताधारी ठेकेदाराच्या मागे राहून हे काम करून घेत आहेत. त्यामुळे मार्च, एप्रिल, मे मध्ये शहरामध्ये रस्ते खोदून पाइपलाइन टाकण्यात आल्या. ठिकठिकाणी कनेक्शन टॅब ठेवण्यात आले; मात्र चर बुजविताना समान पातळीत न बुजविल्याने वाहनधारकांची मोठी अडचण झाली. पावसात चिखल रस्त्यावर आला. अनेक ठिकाणी मोठे खड्डे आहेत. १५ मे किंवा २५ मे पर्यंत शहरातील रस्ते करून देण्याचे आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिले; मात्र पाऊस आणि योजनेतील कामे अपूर्ण असल्याने रस्ते करण्यात ठेकेदाराला अडचणी आल्या.









