Wednesday, June 10, 2026
spot_img
Home चिपळूण लाचखोर डॉ. कांचन मदार यांच्या निलंबनाचा अहवाल वरिष्ठांकडे

लाचखोर डॉ. कांचन मदार यांच्या निलंबनाचा अहवाल वरिष्ठांकडे

लाच घेताना रंगेहाथ अटक; न्यायालयाकडून जामिनावर मुक्तता

रत्नागिरी:- कामथे उपजिल्हा रुग्णालयात गर्भपातासाठी आवश्यक असणारे किट (गोळ्या) देण्याच्या बदल्यात गरोदर महिलेकडे ४ हजार ५०० रुपयांची लाच घेतल्याचा आरोप असलेल्या डॉ. कांचन मदार यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा रुग्णालय आरोग्य प्रशानाकडून उपसंचालक यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. डॉ. मदार या वर्ग दोन अ गटातील वैद्यकीय अधिकारी असून त्यांचे निलंबन करण्याचा अधिकारी आरोग्य उपसंचालकांना असल्याने त्यांच्याकडे हा अहवाल पाठविण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.

मदार यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयापुढे हजर कण्यात आले होते. यावेळी न्यायालयाकडून त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. कांचन मदार यांच्यावरील आरोप हे गंभीर स्वरुपाचे असल्याने त्यांसदर्भात सर्व बाजूनी तपास आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे गर्भपाताच्या गोळ्या देताना एक विशिष्ट प्रक्रिया राबविणे आवश्यक असते. मात्र मदार यांनी गैरमार्गाने गर्भपाताच्या गोळ्या देत होत्या का याविषयी आता चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

कामथे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन शिरीष मदार (४८, रा. पागमळा, चिपळूण) हिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ३ जून रोजी सायंकाळी रंगेहाथ पकडले. या कारवाईने जिल्हा आरोग्य विभागासह संपूर्ण प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या प्रकरणातील तक्रारदार गरोदर होत्या. त्यांना गर्भपात करावयाचा होता.

याकरिता त्यांनी कामथे उपजिल्हा रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन मदार हिची भेट घेतली. या भेटीदरम्यान डॉ. मदार हिने तक्रारदार महिलेला गर्भपातासाठी आवश्यक असणारे किट (गोळ्या) देण्यासाठी ते ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदार महिलेची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याप्रकरणी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. तक्रारदारांच्या अर्जानुसार एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता, डॉ. मदार हिने गर्भपाताच्या किटसाठी ४ हजार ५०० रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य करताच एसीबीच्या पथकाने तात्काळ सापळा रचला. डॉ. मदार हिने तक्रारदार महिलेकडून लाचेची रक्कम तिच्या ‘एमएच ०८ एएक्स २६१८ या क्रमांकाच्या खासगी चारचाकी वाहनात स्वीकारल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष तिला रंगेहाथ ताब्यात घेतले होते. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान याप्रकरणी चौकशी केली जात असून त्यातून काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.