लाखो रुपये खर्च करुन उभारलेले सौर युनिट असूनही जि. प.अंधारातच 

रत्नागिरी:-  जिल्हा परिषदेमध्ये वीज गेल्यानंतर पडणाऱ्या अंधारावर तोडगा काढावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांतून होऊ लागली आहे. अनेक वर्षे जिल्हा परिषदेमध्ये वीज  गेल्यानंतर कोणतीही योग्य  व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्याचे शल्य अधिकाऱ्यांना आता लागून राहिले आहे .लाखो रुपये खर्च करुन उभारलेले सौर युनिट असूनही वीज  गेल्यानंतर जि. प.अंधारातच जात आहे.       

रत्नागिरी जिल्हा परिषद म्हणजे मिनी मंत्रालय… या मंत्रालयामध्ये सोमवारी तसेच वादळवाऱ्या दरम्यान आणि अन्यवेळी वीज  गेल्यानंतर सर्वच कामकाज ठप्प होते. काहींनी मात्र आपले केबिन अत्याधुनिक केले आहे. इनव्हर्टर बसवले आहेत. एसी लावले आहेत. परंतु जनतेला अपेक्षित असणारी जिल्हा परिषद मात्र वीज गेल्यानंतर काळोखात जात आहे. त्यावर योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे आहे. लाखो रुपये खर्च करुन जिल्हा परिषदेत अत्याधुनिक सौरयंत्रणा बसविण्यात आली आहे. या सौर यंत्रणेचा उपयोग वीज बिल कमी करण्यासाठी होत आहे. परंतु वीज  गेल्यानंतर कोणतीच उपाययोजना येथील अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधींना करता आलेली नाही. जिल्ह्याच्या दूरवरील मंडणगड, खेड, दापोली आदी ठिकाणांसह दऱ्याखोऱ्यातून येथे येणाऱ्या नागरिकांची कामे वीज नसेल  तर होत नाहीत यासाठी योग्य ती उपयायोजना करणे गरजेचे आहे अशी मागणी होत आहे.