लांजा पं.स. सभापतींवर गुन्हा दाखल करुन राजीनामा घ्या; भाजपची मागणी

लांजा:- लांजा पंचायत समितीच्या शिवसेनेच्या सभापती यांनी भर सभेत तालुका आरोग्य अधिकारी यांच्या एकेरी व वैयक्तीक उल्लेख करून अपशब्द तसेच अर्वाच्च भाषा वापरत त्यांना अपमानित केल्याच्या वादात आता भाजपने उडी घेत सभापती यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची सभापती पदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली असून अन्यथा भाजपाच्यावतीने जन आंदोलन करण्यात येईल असे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत.

लांजा सभापती लिला घडशी यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मारुती कोरे यांना उद्देशून अर्वाच्य बोलल्यावरुन डॉ. कोरे यांनी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय संघटनेकडे पत्रव्यवहार करुन दाद मागितले आहे. सभापती व डॉक्टर कोरे यांच्यामध्ये झालेल्या वादात आता भाजपने उडी मारुन वादाला चांगलीच फोडणी दिली आहे. भाजपने गुरुवारी प्रभारी तहसीलदार उज्वला केळूस्कर यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष मुन्ना खामकर , सचिव हेमंत शेट्ये , शहर अध्यक्ष प्रमोद कुरुप , विजय कुरुप , सुधाकर शेट्ये , प्रसन्न दिक्षित , जितेंद्र चव्हाण , बावा राणे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते .

भाजपने जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मारुती कोरे हे प्रामाणिक व उत्तम काम करत आहेत. तसेच कोरोना कालावधीत तालुक्यामध्ये कोरोनाचा रुग्ण संख्या वाढणार नाही. यासाठी दिवस-रात्र काम करीत आहेत. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाची रुग्ण संख्या कमी होत आहे. दि. ४ सप्टेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र साटवली येथे रूग्ण कल्याण समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेनंतर स्नेहभोजन कार्यक्रम सुरू होता. यावेळी चर्चेदरम्यान सभापती लिला घडशी यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मारुती कोरे यांना कार्यालयातील शिपाई यांची बदली झालेली असताना त्यांना का जावू दिले नाही अशी विचारणा केली. डाॅ. मारूती कोरे स्पष्टीकरण देत असताना सभापती लिला घडशी यांनी मारूती कोरे यांना वैयक्तिक भाषा वापरून अपशब्द वापरण्यात आले व त्यांना अपमानित केले आहे. सभापती या तालुक्याच्या प्रथम नागरिक मानल्या जातात. त्यांच्याकडून ही भाषा योग्य नाही तरी भारतीय जनता पार्टी या गोष्टींचा निषेध करत आहोत. सदरील प्रकरणी चौकशी होवून सभापती पंचायत समिती लांजा यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात येवून त्यांचा राजीनामा घेण्यात यावा असे न झाल्यास भाजपच्या वतीने जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे .

या निवेदनाच्या प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. रत्नागिरी, पोलीस अधिक्षक रत्नागिरी, जिल्हा वैद्यकीय अधिकारी रत्नागिरी, तहसीलदार लांजा, पोलीस निरिक्षक लांजा, गटविकास अधिकारी पं. स. लांजा यांना सादर करण्यात आली आहेत.