मुंबई:- भारतरत्न लता मंगेशकर यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कंडी रूग्णालयात आज रविवारी निधन झाले. लतादीदींच्या निधनामुळे केंद्राच्या गृह विभागाने दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. तर राष्ट्रध्वजही अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने लता मंगेशकर यांच्या निधनामुळे सोमवार ७ फेब्रुवारी रोजी एक दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात दादरच्या शिवाजी पार्क मैदानात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. महाराष्ट्राप्रमाणेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही सोमवारी एक दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार दि ६ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१( सन १९८१चाअधिनियम २६ ) च्या कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
मंत्रालयातही राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे. तसेच भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिल्या आहेत. त्यासाठीची तयारी शिवाजी पार्क येथे पूर्ण झाली आहे. काही तासांआधीच राज्याचे पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवाजी पार्क मैदानातील व्यवस्थेची पाहणी केली होती. त्यांच्यासोबतच मुंबई पोलिसांच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील हेदेखील होते.
मुंबईतील लतादीदींचे पेडर रोडवरील घर प्रभू कुंज येथून शिवाजी पार्क येथे नेण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणावर लतादीदींच्या चाहत्यांनी त्यांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. शिवाजी पार्कातही मोठी गर्दी पाहता याठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी हे सायंकाळी ५.३० वाजता हजर राहणार आहे. मुंबईच्या शिवाजी पार्क येथे लतादीदींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. लतादीदींना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवल्याने त्यांचे पार्थिव राष्ट्रीय ध्वज तिरंग्यात गुंडाळण्यात येईल. तसेच पोलीस बॅंडद्वारे संवेदना गीत आणि त्यानंतर बंदुकीची सलामी लतादीदींना देण्यात येईल.









