रोहयोत अकुशल कामगारांना रोजगार देण्यात जिल्हा कोकणात अव्वल

रत्नागिरी:- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबवत जास्तीत जास्त अकुशल कामगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात रत्नागिरी जिल्ह्याने राज्यात पाचव्या तर कोकणात अव्वल क्रमांक पटकावला आहे. कोरोनाच्या टाळेबंदीत कालावधीत फळबाग लावगडीतून अनेकांना रोजगार मिळाला. एप्रिल ते ऑक्टोबर महिन्यात 4 लाख 47 हजार मनुष्यदिन निर्मिती झाली असून 12 कोटी 95 लाख रुपये खर्ची पडले आहेत.

मनरेगांतर्गत झालेल्या कामांचा लेखाजोख दर आठवड्याला शासनाकडे ऑनलाईन सादर केला जातो. प्रत्येक आठवड्यात मनरेगांतर्गत रोजगार निर्मितीचे मुल्यांकन केले जात आहे. मागील आठवड्यात रत्नागिरी जिल्ह्याने बाजी मारली आहे. जिल्ह्यात रोजगार हमी योजना फळबाग लागवडीच्या माध्यमातून प्रभावीपणे राबविली जाते आहे. मागील आठवड्यात 1,137 कामांच्या माध्यमातून 3,522 अकुशल मजूरांना रोजगार उपलब्ध करुन दिला गेला आहे. या कामात सर्व ग्रामसेवक, सरपंच आणि तलाठ्यांनी कोरोना काळातही चांगले काम केले आहे. गतवर्षी मनरेगांतर्गत कामात रत्नागिरी जिल्हा खूपच पिछाडीवर होता; मात्र जिल्हाप्रशासनासह जिल्हा परिषदेकडून योग्य पध्दतीने नियोजन करण्यात आले.

यंदा फळबाग लागवडीवर अनेकांनी भर देत मनरेगांतर्गत प्रस्ताव सादर केले होते. मुंबईहून परतलेल्या चाकरमान्यांनी गावातील पडीक जमिनीवर फळबाग लावडीसाठी पावले उचलली. त्यामुळे कृषी विभागाकडून सुमारे 3 हजार हेक्टरवर तर जिल्हा परिषदेकडून तिनशे हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा मनरेगांतर्गत रोजगार निर्मितीत वाढ झाली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्या विक्रमी मनुष्यदिन निर्मिती नोंदली गेली आहे. फळबाग लागवडीसह, घरकुल, शोषखड्डे, विहिरी यांचाही समावेश आहे.