रोज बघतात मरण…तरीही रचतात सरण; रनपच्या पथकाने केलेत 350 जणांवर अंत्यसंस्कार

रत्नागिरी:-कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची परिस्थिती अतिशय भयानक आणि वेदनादायी आहे. कोरोनाच्या भीतीने नातेवाईक पुढे यायला धजावत नसताना रनपचे दहा जणांचे पथक चर्मालय स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करीत आहे. मृतदेहाला हाताळणे म्हणजे साक्षात मरणच अशी भीती असताना देखील हे पथक दिवसाला दहा ते पंधराजणांवर अंत्यसंस्कार करतात. सर्व खबरदारी घेतो.वर्षभरात 350 पेक्षा अधिक कोरोनाबाधित मृतदेहांना अग्नी दिला मात्र अजूनपर्यंत एकाही कर्मचाऱ्याला कोरोना शिवला देखील नाही.

शहरातील चर्मालय स्मशानभूमितील ही परिस्थिती थरकाप उडवणारीच आहे. गेल्या काही दिवसात कोरोना मृत्यूचे प्रमाण वाढल्याने एक क्षणही विसावा न घेता पालिकेचे कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. पीपीई कीटने वाढणारा गरमीचा त्रास, दिवसभर सुरू असलेले काम, अग्नीचा दाह, याची वाच्यताही ते करत नाहीत.याबाबत पालिकेचे जितेंद्र विचारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पहिल्या लाटेत नातेवाईकसुद्धा अंत्यसंस्कारासाठी येत नव्हते. बेवारसाप्रमाणे आम्ही बाधितांचे दहन करत होतो. हे सर्व अतिशय वेदना देणारे होते. दुसर्‍या लाटेत लोकांची भीती कमी झाली आहे; मात्र मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. मृतांचे नातेवाईक अखेरचे दर्शन किंवा अग्नी देण्यासाठी येत आहेत. आम्ही माणुसकी दाखवून त्यांना पीपीई कीट देतो. एक मोठा बांबू ठेवला आहे. त्याला कापड बांधून नातेवाइकाकडून अग्नी देण्याचा प्रयत्न करतो. तेवढेच त्याना मानसिक समाधान. मात्र मृतदेह पाहून सार्‍यांचेच मन आपोआप भरून येते.

कोरोना विषाणूने माणुसकीसह नाती-गोती दुरावली. पहिल्या लाटेत कोरोनाने मृत्यू झालेल्यांना नातेवाइकांचा खांदा आणि अग्नीही मिळाला नाही, अशी हृदय पिळवटणारी परिस्थिती होती. दुसर्‍या लाटेत कोरोनाची भीती कमी झाली, मात्र मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यामुळे कोविडसाठी राखीव चर्मालय स्मशानभूमीवर ताण आहे. पालिकेच्या दहा कर्मचार्‍यानी दिवसरात्र जीव धोक्यात घालून वर्षांमध्ये 350 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. आजच्या भयावह परिस्थितीतही या कर्मचार्‍यांनी माणुसकी जपली आहे.