रेशन दुकानांत मिळणार बँकेच्या विविध सेवा

रत्नागिरी:- सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे जाळे सर्वदूर पसरावे आणि रेशन दुकानदारांचे उत्पन्न वाढावे, यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाकडून आता रेशन दुकानांकडून बँकेच्या विविध सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या सर्व सुविधा डीजीटील पध्दतीने सुरू करण्यात येणार आहे.

ग्रामीण व दुर्गम भागात बँकेच्या सेवा मिळण्यासाठी व रेशन दुकानांना उत्पन्न मिळावे, यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग या दुकानांमध्ये बँकिंग सेवा उपलब्ध करून देणार आहे. यामध्ये कॅशलेस व्यवहार, देयक, भरणा, आरटीजीएस, कर्जसुविधांचा समावेश असेल. ओटीपी आणि वायोमेट्रिक प्रणालीद्वारे ही सेवा देण्यात येणार आहे.
केंद्राच्या दळणवळण मंत्रालयाने 2018 पासून देशात ’इंडिया पोस्ट पेमेंट बँक सेवा’ पोस्टाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. त्याच धर्तीवर आता रेशन दुकानातून ही सेवा मिळेल. राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांच्या सेवा रेशन दुकानात देण्यात येतील. या संदर्भात बँकांनी जिल्हास्तरावर नोडल अधिकारी नेमावेत, असे आदेशही देण्यात आले आहेत.

बँकांना रेशन दुकानदारांशी करार करावे लागतील. या सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे शासन निर्णयात म्हटले आहे. या पद्धतीमुळे बँकांना अधिकचा व्यवसाय उपलब्ध होईल आणि रेशन दुकानदारांचे उत्पन्न वाढण्याचा अंदाज आहे. रेशन दुकानातील बँकिंगचे सर्व व्यवहार 100 टक्के डिजिटल असतील. रेशन दुकानदारांना नियमित बँकिग कामासाठी मासिक कमाईवर काम करण्याची संधी राहणार आहे. हे काम ऐच्छिक असून, जे रेशन दुकानदार करार करतील त्यांच्याकडेच सेवा सुरू राहिल.