रेल्वेच्या धडकेत उमरेतील युवकाचा मृत्यू

रत्नागिरी:- कोकण रेल्वेच्या मार्गावर अनेक दुर्घटना यापूर्वी घडल्या आहेत. रेल्वेट्रॅकवरुन चालत असल्यामुळे काहींचे जीव गेले आहेत. अशीच एक दुर्घटना कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेस समोर घडली आहे. रत्नागिरी येथील 30 वर्षीय युवकाचा रेल्वेच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. स्वरुप दयानंद कांबळे असं या युवकाचे नाव आहे. स्वरुप हा रत्नागिरीच्या उमरे कांबळेवाडी गावचा रहिवासी होता.

रेल्वेच्या ट्रॅक वरून जाणे, त्या जवळून जाणे हे धोकादायक असते. यावेळी रेल्वेची धडक बसल्यास थेट मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे रेल्वे ट्रॅकवर किंवा त्या जवळून जाणे हे अत्यंत धोकादायक आहे. 8 नोव्हेंबर रोजी शनिवारी दुपारी दुपारी दोनच्या दरम्यान चांदेराई परिसरात काहींना स्वरूप दिसला होता. त्यानंतर तो रेल्वे ट्रॅकच्या जवळ कसा गेला? हे समजू शकलेले नाही. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेस या गाडीची जोरदार धडक या युवकाला बसली आणि यातच त्याचा जागीच मृत्यू झाला.

कांबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर

रत्नागिरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी तालुक्यातील उमरे गावचा स्वरूप हा युवक रत्नागिरी येथील बोटीवर खलाशी म्हणून काम करत होता. तसेच तो अन्य वेळात प्लंबिंग आणि घरांचे रंगकाम ही कामही तो करत असे. स्वरूप याच्या मृत्यूने कांबळे कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. स्वरूप हा एकुलता एक मुलगा असलेला कांबळे कुटुंबाचा मोठा आधार होता. मात्र त्याच्या मृत्यूमुळे मोठा आधार आता हरपला आहे.

स्वरूप याच्या पश्चात, आई-वडील ,पत्नी,दोन लहान मुल असा परिवार आहे. मूळचे रत्नागिरी तालुक्यातील उमरे येथील असलेले कांबळे कुटुंब गेले कित्येक वर्ष रत्नागिरी परिसरात वास्तव्यास आहे. स्वरूप याच्या मृत्यूमुळे रत्नागिरी आणि उमरे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या सगळ्या दुर्दैवी अपघाताची नोंद रत्नागिरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास रत्नागिरी पोलीस करत आहेत.