रेल्वेची धडक लागून कुवारबाव येथील वृद्धाचा मृत्यू

रत्नागिरी:- रेल्वेची धडक बसून कुवारबाव येथील वृध्दाचा मृत्यू झाला. बंडू लक्ष्मण शिंदे (वय ७६ ,रा.रविंद्रनगर कुवारबाव,रत्नागिरी) असे रेल्वेची धडक बसून मृत्यू झालेल्या वृध्दाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २४) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास एमआयडीसी रेल्वे ब्रिज जवळ उघडकीस आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे सुरक्षा बलचे अतुल यादव यांनी ग्रामीण पोलिसांना खबर दिली. यादव हे सोमवारी सकाळी नऊ ते रात्री नऊ या कालावधीत रत्नागिरी रेल्वे सुरक्षा बल पोलिस ठाण्यात शीप इंचार्ज म्हणून ड्यूटीवर होते. सायंकाळी पावणे सहा च्या सुमारास त्यांना रत्नागिरी रेल्वेस्टेशन मास्तर समीर डोंगरे यांनी फोन करुन मडगाव ते मुंबई जाणारी ट्रेन वंदे भारतची वृध्दाला धडक बसल्याची माहिती दिली. अपघाताची माहिती मिळताच रत्नागिरी लोहमार्ग पोलिस स्टेशनचे अंमलदार पोलिस काँस्टेबल आरागडे, शेख हे दोघे घटनास्थळी गेले. त्यांनी १०८ रुग्णवाहिकेला पाचारण करुन घेतले. त्यांतील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी शिंदे यांना तपासून मृत घोषित केले.