Sunday, October 4, 2026
spot_img
Home चिपळूण रुग्णालयातच अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

रुग्णालयातच अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

चिपळूण:- तालुक्यातील वहाळ येथील एका खासगी रुग्णालयात १७ वर्षीय मुलाने पंख्याला साडीने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुःखद घटना घडली आहे. रुग्णालयात रुग्णांच्या नोंदीसाठी गेलेल्या या मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

​    पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १ ऑक्टोबर रोजी रात्री ८:३० ते ९:१५ वाजण्याच्या दरम्यान वहाळ येथील डॉ. विजय सहस्त्रबुद्धे यांच्या ‘आनंदी नर्सिंग होम’ या रुग्णालयात ही घटना घडली.

​साहिल सुरेश भागडे (वय १७ वर्षे, रा. वहाळ घडशीवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेची खबर मयताचे नातेवाईक सुधाकर गोपाळ भागडे यांनी दिली आहे.

​मिळालेल्या तपशिलानुसार, मयत साहिल हा डॉ. विजय सहस्त्रबुद्धे यांच्या हॉस्पिटलमध्ये पेशंटची नोंद करण्यासाठी गेला होता. मात्र, तो रात्री ८:४५ वाजेपर्यंत घरी न परतल्यामुळे खबर देणार सुधाकर भागडे हे आपल्या पत्नी व वहिनीसह सदर रुग्णालयात गेले. तिथे पाहणी केली असता, साहिल हा रुग्णालयात पंख्याला साडीने गळफास घेतलेल्या अस्वस्थ स्थितीत दिसून आला. त्यानंतर तातडीने हॉस्पिटलमधील डॉ. विजय सहस्त्रबुद्धे यांनी त्याला तपासून रात्री ९:१५ वाजता तो मयत झाल्याचे घोषित केले. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.