रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल

दापोली:- शस्त्रक्रिया करताना हलगर्जीमुळे लहान आतड्याला छिद्र पडून जंतुसंसर्ग झाल्याने महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी दापोली येथील दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

डॉ. प्रसाद प्रभाकर आंबेकर तसेच डॉ. अजय प्रभाकर परांजपे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांवर दापोली पोलिस ठाण्यात १९ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत दापोली पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार दि. १ नोव्हेंबर २०२० ते ७ नोव्हेंबर २०२० या कालावधीमध्ये सौ. साक्षी वैजंत देवघरकर (३५, रा. सुतारवाडी) या शस्त्रक्रियेसाठी दापोलीतील स्वामी समर्थ हॉस्पिटल येथे दाखल झाल्या होत्या. त्यांची शस्त्रक्रिया करीत असताना डॉक्टर प्रसाद प्रभाकर आंबेकर (३७, रा. खोडा दापोली) व डॉ. अजय प्रभाकर परांजपे रा.पेण जिल्हा रायगड) यांनी सदर महिलेवर शस्त्रक्रिया केली होती. या वेळी त्यांनी अक्षम्य हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्याने शस्त्रक्रियेदरम्यान रुग्ण साक्षी देवघरकर यांच्या लहान आतड्याला छीद्र पडले होते. त्यामुळे त्यांना जंतुसंसर्ग होऊन त्यांच्या शरीरातील फुफ्फुस, यकृत तसेच किडनी निकामी होऊन त्यांचा ९ नोव्हेंबर २०२० रोजी मृत्यू झाला होता. या प्रकरणी दापोली पोलिसांनी तपासाअंती सरकारतर्फे पोलिस हे. काँ. वैशाली सुकाळे यांच्यातर्फे संशयित डॉ. प्रसाद आंबेकर व डॉक्टर अजय परांजपे यांच्याविरोधात १९ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरेमठ करीत आहेत.