रत्नागिरी:- जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदामुळे रूग्णालय व्हेंटिलेटरव जाणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वी खासगी डॉक्टरांना बोलावून आरोग्य सेवेचे काम चालवले जात होते. परंतु जिल्हा रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाकडे वर्ग झाल्यामुळे १ एप्रिलपासून खासगी सेवा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाची सेवा कोलमडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. सोनोग्राफी देखील थांबली आहे.
रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयाने ३ भुलतज्ञ आणि ३ रेडिओलॅजिस्ट डेप्यूटेशनवर मिळावे, असा प्रस्ताव यापूर्वीच आरोग्य संचालकांना दिला आहे. तसेच अन्य वैद्यकीय अधिकाऱ्यांद्वारे सेवा देण्याचा प्रयत्न असल्याचे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने सांगितले. यापुर्वी जिल्हा रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध होत नसल्यामुळे खासगी डॉक्टरांना पाचारण केले जात होते. सर्व सुविधानीयुक्त रुग्णालय आहे, परंतु वैद्यकीय अधिकारी नाहीत, अशी अवस्था झाली आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये गेली अनेक वर्षे फिजिशियन नाहीत. 31 मार्चपर्यंत पॅनलवरच्या खासगी डॉक्टरांना बोलावून रुग्णांवर उपचार केले जात होते. राष्ट्रीय आरोग्य अभियानातून खासगी डॉक्टरांचे एक पॅनल तयार करण्यात आले होते. पॅनलवरचे डॉक्टर जसे उपलब्ध होतील, तसे त्या डॉक्टरांना जिल्हा रुग्णालयात पाचारण केले जात होते. जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये भूलतज्ज्ञही उपलब्ध नाहीत. दोन स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर असले तरी एका डॉक्टरची बदली झालेली आहे. लहान मुलांचेही डॉक्टर उपलब्ध नसून सध्या मानधनावरील डॉक्टर लहान मुलांवर उपचार करत आहेत. हाडांचे डॉक्टर उपलब्ध नसून मानधनावरील डॉक्टर येऊन सेवा बजावत आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयात यापूर्वी एनआरएचएममधून खासगी डॉक्टरांच्या पॅनलवरील डॉक्टरांना बोलावून रुग्णांवर उपचार केले जात होते. त्यांचे मानधन एनआरएचएममधून दिले जायचे. परंतु जिल्हा शासकीय रुग्णालय आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ताब्यात गेल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय एनआरएचएममधून खासगी डॉक्टरांना बोलावू शकत नाही. त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांची चिंता वाढली आहे. आता डॉक्टर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची आहे.
शस्त्रक्रिया रखडतात
जिल्हा शासकीय रुग्णालयात भूलतज्ञ नसल्यामुळे अनेक शस्त्रक्रिया रखडतात. खासगी भूलतज्ञाना बोलावू शकत नसल्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयाला त्यांच्या ग्रामीण रुग्णालयातून भूलतज्ञ आणावे लागतात. सध्या दापोली, चिपळूण आणि राजापूरच्या ग्रामीण रुग्णालयात भूलतज्ञ उपलब्ध आहेत. काही दिवसांपूर्वी एका शस्त्रक्रियेसाठी दापोलीहून भूलतज्ञ बोलवावे लागतात.
इंडियन पब्लिक हेल्थ सिस्टमकडुन खासगी सेवेबाबत ३१ जुनपर्यंत मुदतवाढ मागितली होती. परंतु ती ३१ मार्चपर्यंतच मिळाली. त्याआधीच आम्ही ३ भुलतज्ञ, ३ रेडिओलॉजिस्ट डेप्यूटेशनवर मिळावे, असा प्रस्ताव दिला आहे. तसेच अन्य वैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घेतली जात आहे. या प्रश्नावर रोज पालकमंत्री उदय सामंत आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांच्या संपर्कात आहोत. रेडिओलॉजिस्ट आहेत, परंतु त्यांना लेखी आदेश नसल्याने सोनोग्राफी होत नाही.
—डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता, रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालय