राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांना एसीबीची नोटीस

रत्नागिरी:- आ. राजन साळवी, आ. वैभव नाईक यांच्या नंतर आता दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम यांनाही एसीबीच्या चौकशीची नोटीस आली आहे. ही नोटीस त्यांना सोमवारी प्राप्त झाली असून या नोटीसमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

संजय कदम यांनी २०१४ ते २०१९ या कालामध्ये माजी आमदार यांच्या वाढलेल्या मालमत्तेची एसीबीने सखोल चौकशी करून तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार यांनी केल्याचे कळते आहे.

संजय कदम हे काही दिवसातच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर झाल्यानंतरच ही नोटीस आल्यामुळे संजय कदम यांच्या समर्थकांमध्ये कमालीचा संताप व्यक्त होत आहे. विरोधकांना जाणीवपूर्वक चौकशी चौकटीत अडकविण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय संजय कदम समर्थकांनी व्यक्त केला आहे.