रत्नागिरी:- रत्नागिरीत गुरुवारी रामनवमीचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. रत्नागिरी शहरातील राम आळीतील प्रभू श्री राम मंदिरात राम जन्मोत्सव सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. प्रभू श्री रामचंद्रांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर हा दुमदुमून गेला होता.
शहरातील राम मंदिरासह इतर राममंदिरांमध्ये गुरुवारी सकाळपासून भाविकांनी मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी गर्दी केली होती. तसेच रामनवमीच्या निमित्ताने होणाऱ्या विविध कार्यक्रमांची देखील जय्यत तयारी सुरू होती. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या वेशभूषांमध्ये तरुण, लहान मुले पाहायला मिळाले.
गुरुवारी पहाटेपासून श्रीराम मंदिरात भजन आणि कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दूपारी १२ वाजेच्या सुमारास भक्तिमय आणि उत्साहाच्या वातावरणात शहरातील राममंदिरामध्ये रामजन्मोत्सव सोहळा साजरा झाला. यावेळी राम सीता जय सीताच्या घोषणांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. सायंकाळी प्रभू श्रीरामाची भव्यदिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. यात अनेक चित्ररथ आणि हजारो भाविक सहभागी झाले होते.









