रत्नागिरी:- वर्धा येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरीतील जिजीपीएस शाळेच्या श्रुती काळे हिने दैदिप्यमान यश संपादन केले आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेत श्रुतीने एक सुवर्ण तर एका रौप्य पदकाची कमाई करत रत्नगिरीचे नाव उंचावले.
तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रा व वर्धा जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने 32 वी महाराष्ट्र राज्य कॅडेट तायक्वांदो अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धा घेण्यात आली होती. ही स्पर्धा 12 ते 14 फेब्रुवारी दरम्यान वर्धा जिल्ह्यातील पुलगाव लक्ष्मी सेलिब्रेशन हॉल येथे पार पडली. या राज्यस्तरीय स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा संघात रत्नागिरी तालुक्यातील युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर नाचणे ओम साई मित्र मंडळ येतील तायक्वांदो प्रशिक्षण वर्गातील खेळाडू श्रृती संतोष काळे ही सहभागी झाली होती. श्रुती काळे हिने यापूर्वी देखील जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेत आपली छाप सोडली आहे. या स्पर्धेत देखील श्रुतीने स्पर्धेवर आपली छाप सोडत एक सुवर्ण आणि एका रौप्य पदकाची कमाई केली. तिच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.









