मुंबई:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होळी आणि धुलिवंदनवर घालण्यात आलेले निर्बंध राज्य सरकारने मागे घेतले आहेत. राज्य सरकारने होळी रात्री १० च्या आत पेटवण्याचे बंधन घातले होते. तसेच परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी डिजेबरोबरच मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावण्यासही बंदी घालण्यात आली होती. यानंतर विरोधकांसह सर्वसामान्यांकडून नाराजी जाहीर करण्यात आली होती. यानंतर राज्य सरकारने अखेर हे निर्बंध मागे घेतले आहेत.
तसेच हे निर्बंध मागे घेतल्यामुळे यंदा निर्बंधमुक्त होळी, धूलिवंदन साजरा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर याअगोदर नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईची तरतूद गृहविभागाने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक नियमावलीत करण्यात आली होती. राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना ही नियमावली पाठवत या काटेकोर पालन करण्याचा आदेश देण्यात आला होते.
दरम्यान भाजपा आमदार राम कदम यांनी या निर्बंधांवरुन संताप व्यक्त केला होता. महाराष्ट्र सरकारचा हिंदू सणांना इतका टोकाचा विरोध का? अशी विचारणा त्यांनी केली होती. तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात; आम्ही आमचा हिंदू सण जल्लोषात साजरा करणारच असा इशाराही यावेळी त्यांनी दिली होता. तसेच सरकारने निर्बंध मागे घेतल्यानंतर त्यांनी स्वागत केले असून इतक्या उशीरा शहाणपण सुचले असा टोलाही लगावला आहे.
अशी आहे नवी नियमावली
होळी/शिमगा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी 17 मार्च, 2022 रोजी होळीचा सण आहे. कोविड संक्रमणामुळे हा सण शक्यतोवर गर्दी न करता कोविड अनुरुप वर्तणूक नियमांचे पालन करुन साजरा करावा.
18 मार्च 2022 रोजी धुलिवंदन व 22 मार्च 2022 रोजी रंगपंचमी हे सण साजरे करण्यात येणार आहेत. या सणानिमीत्ताने एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करण्यात येत असते. परंतु कोविड- 19 चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी धुलिवंदन आणि रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत.
होळी / शिमगा सणा निमित्ताने (विशेष करून कोकणात) पालखीची मिरवणूक काढण्यात येते. परंतू यावर्षी देखील पालखी घरोघरी न नेता स्थानिक मंदिरातच दर्शनाची व्यवस्था होईल याकरीता स्थानिक प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. तसेच त्याठिकाणी गर्दी होणार नाही व कोविड अनुरुप वर्तणूक नियमांचे तंतोतंत पालन होईल याकडे सर्वतोपरी लक्ष देऊन योग्य ती दक्षता घ्यावी.
कोविड- 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.
तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.









