राजापूर:- गेले आठवडाभर संततधारेने कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी रात्रीपासुनच जोर धरल्याने मंगळवारी पहाटे राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. पुराचे पाणी जवाहर चौकातील राधाकृष्ण कोल्ड्रिंक्सपर्यंत पोहोचले असुन जनजीवन विस्कळीत झाले आहे. शीळकडे जाणारा मार्ग पाण्याखाली गेला असुन शहरातील बहुतांशी भाग पुराच्या पाण्याखाली गेला आहे. तर व्यापाऱ्यानी आपला माल सुरक्षितस्थळी हलवला आहे.

सोमवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने अर्जुना नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन कोदवली नदीचे पाणी शहर बाजारपेठेत शिरले आहे. शहरातील भटाळी, गुजराळी, वरचीपेठ, चिंचबांध, आंबेवाडी आदी भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. मंगळवारी पहाटे पुराच्या पाण्याचा जोर जास्तच वाढल्याने राजापूर बाजारपेठेतील व्यापाऱ्यानी आपल्या दुकानातील माल सुरक्षितस्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे. शहरातील शिवाजी पथ रस्ता पुर्णतः पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील व्यापाऱ्यानी व रहिवाशांनी आपले सामान सुरक्षितस्थळी हलवले आहे.
सकाळी सहा वाजता शहरातील जवाहर चौकात पुराचे पाणी भरल्याने शहरातील संपुर्ण वाहतुक व्यवस्था कोलमडली आहे. हवामान खात्याने मंगळवारी कोकणातील जिल्ह्यांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केल्याने जिल्हा प्रशासनाने सोमवारी रात्रीच जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयाना सुट्टी जाहीर केली आहे. आजच्या पावसाने तालुक्यातील अनेक भागात पुराचे पाणी शिरल्याने संपुर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. राजापूर जवाहरचौक परिसरात पाणी आले आहे. नगर परिषद सर्व यंत्रणा कार्यरत आहे. आपत्कालीन बोट सज्ज आहे. व्यापाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. स्पीकरवरुन सावध राहण्याबाबत नागरिकांना सतर्क राहण्याचे सूचित करण्यात आले आहे.