Friday, June 12, 2026
spot_img
Home राजापूर राजापुरात दुचाकी अपघातात सामाजिक कार्यकर्ते अमृत तांबडे यांचा मृत्यू

राजापुरात दुचाकी अपघातात सामाजिक कार्यकर्ते अमृत तांबडे यांचा मृत्यू

तीन दिवस मृत्यूशी झुंज अपयशी

पाचल:- जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या भीषण दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेले राजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते अमृत अनंत तांबडे (वय ४२, रा. वरचीपेठ) यांचे आज (शनिवारी) सकाळी उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या तीन दिवसांपासून ते मृत्यूशी झुंज देत होते.

बुधवारी उशिरा रात्री आपल्या घरी परतत असताना वरचीपेठ येथील शासकीय विश्रामगृहाखालील धोकादायक वळणावर त्यांची दुचाकी घसरल्याने हा अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

अपघातानंतर घटनास्थळावरून जाणाऱ्या एका रिक्षाचालकाने तात्काळ एस.टी. डेपो परिसरातील युवकांना माहिती दिली. स्थानिक युवकांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली असता तांबडे यांच्या अंगावर दुचाकी पडलेली होती आणि ते गंभीर जखमी अवस्थेत आढळले. तत्काळ रुग्णवाहिका बोलावून त्यांना राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना पुढे सांगली येथील रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असतानाच आज (शनिवारी) सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

अमृत तांबडे हे राजापूर परिसरात सक्रिय सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. त्यांनी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका राजापूर मतदारसंघातून लढवल्या होत्या. काही वादग्रस्त मुद्दे त्यांनी हाताळले होते. त्यामुळे घात की अपघात अशी चर्चा देखील सुरू आहे. सध्या ते ज्योतिष व्यवसायात कार्यरत होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने राजापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले आणि एक विवाहित बहीण असा परिवार आहे.