राजापूर:- तालुक्यातील सौंदळ रेल्वे स्टेशनजवळील बारेवाडी बोगद्याजवळ एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला. अंदाजे ४० वर्षे वय असलेला हा पुरुष रेल्वेच्या धडकेत मरण पावला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
ही घटना १९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. सौंदळ रेल्वे स्टेशनच्या हद्दीतील मैल दगड क्रमांक २५८/१ ते २५८/२ च्या दरम्यान बारेवाडी बोगद्याजवळ हा मृतदेह आढळला. कोणत्यातरी रेल्वेची धडक बसल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असे घटनास्थळावरून दिसत आहे.
याबाबतची माहिती राजापूर पोलिसांना दुपारी ४.२० वाजता देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि अज्ञात व्यक्ती म्हणून आकस्मिक मृत्यूची नोंद (आमृ. क्रमांक २३/२०२५, बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे) केली आहे. मृतदेहाची ओळख पटवण्याचे आणि पुढील तपास करण्याचे काम राजापूर पोलीस करत आहेत.