Wednesday, June 17, 2026
spot_img
Home राजापूर राजापुरात दुचाकी घसरून भीषण अपघात

राजापुरात दुचाकी घसरून भीषण अपघात

सामाजिक कार्यकर्ते अमृत तांबडे गंभीर जखमी

राजापूर:- राजापुरातील जुन्या मुंबई गोवा महामार्गावर वरचीपेठ येथे शासकिय विश्रामगृहाच्या खालील वळणावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात राजापुरातील सामाजिक कार्यकर्ते अमृत अनंत तांबडे (४२, रा. वरचीपेठ राजापूर) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून अधिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरीतील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी रात्री १२ वाजण्याच्या दरम्यान हा अपघात घडला आहे.

तांबडे हे बुधवारी रात्री आपल्या घरी जात असताना हा अपघात झाला असावा असा पोलीसांचा कयास आहे. राजापुरातील जकात नाक्यावरून पुढे जाणाऱ्या जुन्या मुंबई गोवा महामार्गावर वरचीपेठ येथे शासकिय विश्रामगृहाच्या खालील वळणावर हा अपघात झाला. या मार्गावरून येणाऱ्या एका रिक्षा व्यावसायिकाने याबाबत रात्री एस.टी. डेपो परिसरातील काही युवकांना माहिती दिली. तात्काळ काही युवकांनी अपघातस्थळी धाव घेतली यावेळी तांबडे यांच्या अंगावर दुचाकी पडून ते अडकले होते, व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. गंभीर जखमी असलेल्या तांबडे यांना तात्काळ रूग्णवाहिका मागवून प्राथमिक उपचारासाठी राजापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्यांची प्रकृती गंभीर असल्याने अधिक उपचारासाठी रत्नागिरीत हलविण्यात आले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली असून अपघाताची नोंद केली आहे.