रत्नागिरी:- कोकण रेल्वेचे विद्युतीकरण पूर्ण झाल्याने आता या मार्गावरील राजधानी, कोकणकन्या व मांडवी एक्सप्रेस उद्यापासून विजेच्या इंजिनवर धावणार असल्याने प्रवास प्रदूषणमुक्त आणि अधिक वेगवान होणार आहे.
जानेवारी २०२३ पासून कोकणकन्या एक्सप्रेसला सुपरफास्टचा दर्जा देण्यात येणार असल्याने तिच्या प्रवासात दोन तास दहा मिनिटांची बचत होणार असून तिचा क्रमांकही बदलणार आहे. ट्रेन क्र. १०१११ / १०११२ मडगाव – सीएसएमटी कोकणकन्या आणि ट्रेन क्र.१०१०३ / १०१०४ मडगाव सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस शनिवार ८ ऑक्टोबरपासून विजेच्या इंजिनावर धावणार आहे. कोकण रेल्वेच्या ७४१ कि.मी.च्या मार्गाचे शंभर टक्के विद्युतीकरण मार्चमध्ये पूर्ण झाले होते. कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची आता हवा आणि ध्वनीच्या प्रदूषणातून संपूर्णपणे मुक्तता होणार आहे.