रत्नागिरीः– मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांच्याबदल महाड येथील पत्रकार परिषदेत अपशब्द उच्चारल्यामुळे केंद्रीय मंत्री ना. नारायणराव राणे यांच्या अटकेची कारवाई यामुळे जिल्ह्यातील वातावरण तप्त झाले होते. अशा स्थितीत पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीसांनी संयमासह कौशल्याने परिस्थिती हाताळल्यामुळे राजकीय संघर्ष टळला. जिल्ह्यात सेना-भाजप या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते चिपळूण व आरवली येथे आमने – सामने उभे ठाकले होते. मात्र त्यांच्यात संघर्ष होणार नाही, याची दक्षता पोलीसांनी घेतल्यामुळे एवढ्या मोठ्या राजकीय संघर्षमय स्थितीत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात जिल्हा पोलीसांना यश आले आहे.
जन आशिर्वाद यात्रेद्वारे केंद्रीय मंत्री ना. नारायणराव राणे हे मंबईतून कोकणात दाखल झाले. महाड येथील पत्रकार परिषदेत ना. राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द उच्चारल्यामुळे आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी राज्यात विविध ठिकाणच्या पोलीस स्थानकांत ना. राणे यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्याने त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर लगेचच महाड, नाशिक व पुणे पोलीसांनी ना.राणे यांना अटक करण्याचा निर्णय घेतला. मात्र याच दरम्यान ना. राणे जनआशिर्वाद यात्रा घेवून संगमेश्वर तालुक्यातील गोळवली येथील गोळवलकर गुरुजी स्मारकात पोहचले होते. येथे ना.राणेच्या अटकेसाठी महाड पोलीस दाखल झाल्याने संगमेश्वरमध्ये तणावपुर्ण स्थिती निर्माण झाली होती. एका बाजूला ना.राणे यांच्या विरोधात शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक होत रस्त्यावर आले होते. तर ना. राणे यांच्या अटकेच्या शक्यतेमुळे भाजपचे कार्यकर्तेही रस्त्यावर उतरले होते. अशा परिस्थितीत ना.राणे यांना कायदेशीर बाबी समजावून पोलीसांनी त्यांना संगमेश्वर पोलीस स्थानकात आणल्यानंतर तेथे संघर्षमय स्थिती निर्माण झाली. भाजपा आमदारांसह कार्यकर्ते आक्रमक झाले होते. रस्ता रोको करण्याचा प्रयत्न सुरु होता . तर जिल्ह्यात सर्वत्र शिवसैनिक रस्त्यावर उतरल्यामुळे पोलीसांचा फौजफाटा सर्वत्र विखुरलेल्या अवस्थेत होता. असे असतानाही उपलब्ध मनुष्यबळाचा कौशल्याने पुरेपूर उपयोग करून पोलीसांनी सेना- भाजपात कोणताही संघर्ष होवू दिला नाही. ना.राणे यांना अटकेची कल्पना देवून न्यायालयीन बाब समजावून सांगत तसेच त्यासाठी पुरेसा वेळ भाजप कार्यकर्त्यांना देऊन रत्नागिरी पोलीसांनी सर्व कायदेशीर तरतुदींचे पालन करत ना.राणे यांना महाड पोलीसांच्या ताब्यात दिले. त्याचप्रमाणे आक्रमक झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांनाही पोलीसांनी आपल्या विशेष कौशल्याने शांत करुन संगमेश्वरमध्येही कायदा व सुव्यस्था बिघडू दिली नाही. तसेच रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्यात आली. मा. जिल्हा पोलीसांच्या या विशेष कौशल्याचे व संयमी वर्तणुकीचे सर्वसामान्य नागरिकांनी कौतूक केले आहे. पोलीस अधिक्षक डॉ.मोहित कुमार गर्ग यांच्या नेतृत्वाखाली अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री देसाई, उपविभागिय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, पोलीस निरिक्षक उदय झावरे यांच्यासह पोलीस अधिकारी अंमलदार यांनी सर्व गंभीर परिस्थिती काळजीपुर्वक हाताळली आहे.