रत्नागिरी:-कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने प्रशासनाने खबरदारी बाळगली आहे. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम, निवडणुकांवर निर्बंध आहेत. याचा फटका रत्नागिरी पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला बसण्याची शक्यता आहे. २२ डिसेंबरला विद्यमान सदस्यांचा कालावधी संपुष्टात येणार आहे; मात्र निवडणुकीच्या अनुषंगाने कोणतीच प्रक्रिया सुरू नाही, अवधीही कमी राहिला आहे. त्यामुळे पालिकेवर प्रशासक नियुक्तीची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मात्र इच्छुकांनी आपली मोर्चेबांधणी सुरू ठेवली आहे.
रत्नागिरी पालिकेची विद्यमान सदस्यांची २२ डिसेंबरला मुदत संपत आहे. त्यामुळे डिसेंबरला पालिकेची पंचवार्षिक निवडणूक आहे; मात्र कोरोना महामारीचा या निवडणुकीवर परिणाम झाला आहे. पाच ते सहा महिने आधी निवडणूक आयोग निवडणूक कार्यक्रम जाहीर करते. त्यामध्ये मतदार यादीचे पुनर्निरीक्षण करणे, प्रभागांची फेररचना करून ते निश्चित करणे, आरक्षण सोडत कार्यक्रम घेणे ही सर्व प्रक्रिया होते; मात्र कोरोनाची दुसरी लाट अजून कायम आहे. ती ओसरत असली तरी ती संपलेली नाही. कोल्हापूरच्या गोकूळ संघाची या महामारीत निवडणूक झाल्याने त्या जिल्ह्याला त्याचे परिणाम अजून भोगावे लागत आहेत. म्हणून निवडणूक आयोग ताकही फुंकून पीत आहे. निम्मा ऑगस्ट महिना संपत आला आहेत. अवघे चार महिने शिल्लक असतानाही निवडणुकीच्या कोणत्याही हालचाली नाहीत.
रत्नागिरी पालिकेचे ३० प्रभाग आहेत. पंधरा वॉर्डमधून दोन नगरसेवक याप्रमाणे ही निवडणूक झाली होती; मात्र आता प्रभाग रचना बदलली जाणार आहे. ३० वॉर्डचे ३२ वॉर्ड होण्याची शक्यता असून प्रत्येक वॉर्डला एक नगरसेवक अशी रचना असणार आहे. त्यामुळे इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. अनेक विद्यमान नगरसेवक आणि इच्छुकांनी वर्षभरापासूनच निवडणुकीच्या कामाला सुरवात केली आहे; मात्र त्यांचा हिरमोड झाला आहे. निवडणूक आयोगाचा अजूनही पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात कोणताही कार्यक्रम आला नसल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.
कोरोना महामारीच्या संसर्गाचा अंदाज घेऊन हा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे; मात्र मुदत कमी असल्याने २२ डिसेंबरला पालिकेवर प्रशासन नियुक्ती होण्याची शक्यता आहे. त्यांच्या नियुक्ती कालावधीत महिना ते दोन महिन्यात निवडणुका लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.