रनपचा थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा; ७३ मालमत्ता सील, ६१ नळ कनेक्शन खंडित

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात थकीत घरपट्टी आणि कर वसुलीसाठी नगर परिषदेने आता अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. वारंवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांविरुद्ध जप्ती पथकाने थेट कारवाईचा बडगा उगारला असून, यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. मुख्याधिकारी श्री. गारवे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली ही धडक मोहीम राबवली जात आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत तब्बल ७३ मालमत्तांना टाळे ठोकून त्या सील करण्यात आल्या आहेत. इतकेच नव्हे तर, घरपट्टी थकवणाऱ्या ६१ मालमत्तांचे नळ कनेक्शन खंडित करण्यात आले असून संबंधित धारकांना कडक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ज्यांची घरपट्टी येणे बाकी आहे, त्यांचे नळ कनेक्शन कापण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.

​आर्थिक वर्षाचा शेवट जवळ येत असल्याने जास्तीत जास्त कर संकलित करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. मालमत्ताधारकांच्या सोयीसाठी आणि कर भरणा सुलभ व्हावा यासाठी दिनांक २१, २२, २६, २८, २९ आणि ३१ मार्च २०२६ या सुटीच्या दिवशीही नगर परिषदेचे कार्यालय सुरू ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी वेळेत कर भरून कटू कारवाई टाळावी, असे आवाहन पालिकेमार्फत करण्यात आले आहे.

​सध्या पालिकेसमोर एकूण १५ कोटी ८७ लाख ५० हजार ६४८ रुपयांची मागणी (डिमांड) आहे. त्यापैकी आतापर्यंत १० कोटी ३१ लाख १३ हजार ०६१ रुपयांची वसुली पूर्ण झाली आहे. एकूण वसुलीची टक्केवारी ६५% इतकी झाली असून, उर्वरित ३५% वसुली पूर्ण करण्यासाठी जप्ती पथक शहरात ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहे.