रनप हद्दवाढीचा मुद्दा पुन्हा अजेंड्यावर 

क दर्जाची महानगरपालिका बनवण्यासाठी प्रयत्न 

रत्नागिरी:- येथील पालिकेच्या हद्दवाढीच्या विषयाला पुन्हा हवा मिळाली आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीणारायण मिश्रा यांनी पालिकेला भेट दिल्यानंतर या विषयाला चालना मिळाली. जवळपासच्या 15 किमी परिघातील 15 ग्रामपंचायतींचा पालिकेत समावेश करून ‘क’ दर्जांची महानगरपालिका बनविण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांशी चर्चा करून ग्रामपंचायतींनी विश्‍वासात घेऊन ना हरकत मिळविला जाणार आहे. त्यामुळे हद्दवाढीचा दुसरा प्रयत्न यशस्वी होणार की, पुन्हा बारगळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

पालिकेने आठ ते दहा वर्षांपूर्वी रत्नागिरी पालिकेची हद्दवाढ करण्याचा प्रयत्न केला होता. तसा प्रस्ताव पालिकेने 15 किमीच्या परिघात येणार्‍या ग्रामपंचायतींना दिली होता.  युतीची सत्ता आल्यानंतर नगराध्यक्ष मिलिंद कीर आणि मुख्याधिकारी एम. व्ही. खोडके यांनी सभेत ठरावाला मंजूरी घेतली आणि जिल्हाधिकार्‍यांमार्फत हा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला. प्रस्तावामध्ये शिरगाव, मिर्‍या, कुवारबाव, मिरजोळे, भाट्ये, फणसोप, खेडशी यासह हातखंबा, सडामिर्‍या, मिरजोळे, खेडशी , झरेवाडी, पोमेंडी, कुवारबाव, नाचणे, भाट्ये, झरेवाडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. मात्र सर्व ग्रामपंचायतीने हद्दवाढीला विरोध दर्शविला होता. प्रस्तावाविरुद्ध सरपंचांची बैठक झाली. त्यांनी संघर्ष समिती स्थापन करून हद्दवाढीला विरोध करण्याचा निर्णय घेतला. ग्रामपंचायतींच्या निर्णयाला आमदार उदय सामंतांनी पाठिंबा आदी हा विषय तिथेच थांबला. जिल्हाधिकारी मिश्रा यांनी पुन्हा हद्दवाढीच्या प्रस्तावाला चालना दिली आहे. पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांच्याशी त्यांनी चर्चा केली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांच्याशी चर्चा करून या ग्रामपंचायतींच्या नाहरकत मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. एका ग्रामपंचायतीने एनओसी दिल्याचेही समजते.