रनप निवडणुकीसाठी भाजपकडून स्वतंत्र किंवा मैत्रीपूर्ण लढतीची तयारी

रत्नागिरी;- रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून प्रत्येक प्रभागात तीन ते चार उमेदवार इच्छुक आहेत. त्यामुळे एका घरातून एकच उमेदवार देण्याचे नियोजन सेना नेते तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून केले जात आहे. ही परिस्थिती भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शहराध्यक्ष दादा ढेकणे यांना माहीत असल्याने भाजपकडूनही स्वतंत्र किंवा मैत्रीपूर्ण लढत देण्याची तयारी पूर्ण झाली आहे.

रत्नागिरीत शिवसेना-भाजप युती होईल की नाही, याबाबत कोणतीही निश्चिती नाही. शिवसेनेकडे प्रत्येक प्रभागातून ३ ते ४ उमेदवारांची गर्दी झालेली आहे. अशावेळी नाराजी टाळण्यासाठी एका घरातून एकच उमेदवार देण्याबाबत विचार सुरू आहे. भाजपला समाधानकारक जागा मिळाल्या नाहीत तर नगराध्यक्षपदाची अपेक्षा आहे. परंतु शिवसेनेकडे नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदासाठी उमेदवारांची रांग पाहता भाजपला नगराध्यक्ष पदासह समाधानकारक जागा मिळण्याबबात साशंकता आहे.

भाजपने शिवसेनेकडची राजकीय परिस्थिती पाहता काही महिन्यांपूर्वी पासूनच स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली. महिलांसाठी विविध कार्यक्रम घेतले जाऊ लागले. महिला नेत्या वर्षा ढेकणे आणि जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली इतरही पक्षीय उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यामुळे रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युती होईल की नाही, हे सध्या एक कोडे बनले आहे.

शिवसेनेकडून गेल्या अनेक महिन्यांपासून विविध सण, उत्सवाच्या निमित्ताने इच्छुक उमेदवारांनी आपापल्या मतदासंघात घरोघरी संपर्क ठेवला. या संपर्कात पालकमंत्री उदय सामंत यांनी केलेल्या विकासकामांची माहिती दिली गेली. पाच वर्षांपूर्वी रत्नागिरी नगर परिषदेवर प्रशासक आल्यानंतर शिवसेनेचे अनेक नेते लोकांची कामे करत राहिले. भाजपकडून विविध प्रश्नांची सोडवणूक करून घेण्यासाठी संबंधित यंत्रणांकडे निवेदने देऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न झाला आहे. दोन्ही बाजूंनी अशाप्रकारे स्वतःची ताकद वाढवण्याचा प्रयत्न झाला असल्याने युती होण्याबाबत साशंकताच आहे.