रत्नागिरीतील ७ स्थानिक स्वराज्य संस्थांचा उद्या फैसला

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील ४ नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतींची निवडणूक ऐतिहासिक टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासकांच्या ताब्यात असलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तिजोरीच्या चाव्या आता पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींच्या हातात येणार आहेत. उद्या, रविवारी या ७ संस्थांच्या निवडणुकीची मतमोजणी होणार असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष निकालाकडे लागले आहे.

​रत्नागिरी, राजापूर, चिपळूण आणि खेड या नगरपरिषदांवर डिसेंबर २०२१ पासून, तर गुहागर आणि देवरुख नगरपंचायतींवर मे २०२३ पासून प्रशासक नियुक्त होते. लांजा नगरपंचायतीवर फेब्रुवारी २०२५ मध्ये प्रशासक आले होते. तब्बल ८ ते १० वर्षांनंतर या निवडणुका पार पडत असल्याने ही निवडणूक ऐतिहासिक मानली जात आहे. सोमवारपासून लोकप्रतिनिधी पुन्हा एकदा या संस्थांचा कारभार सांभाळताना दिसतील.

​या ७ स्थानिक स्वराज्य संस्थांचे एकूण बजेट ५८२ कोटी रुपयांचे आहे. आता नूतन नगराध्यक्ष, सभापती आणि नगरसेवकांच्या हातात या मोठ्या निधीच्या नियोजनाचे अधिकार येणार आहेत.

​प्रशासक येण्यापूर्वी रत्नागिरीत शिवसेनेचे वर्चस्व होते, तर चिपळूण आणि खेडमध्येही चुरस होती. राजापूरमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेचे समसमान बलाबल होते. यावेळी बदललेल्या राजकीय समीकरणामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट लढत होत आहे. दापोली आणि मंडणगड नगरपंचायतीची मुदत फेब्रुवारी २०२७ मध्ये संपणार असल्याने, सध्या केवळ या ७ जागांचा निकाल जाहीर होणार आहे.

​उद्याच्या मतमोजणीनंतर ५८२ कोटींच्या या तिजोरीच्या चाव्या कोणत्या पक्षाच्या किंवा आघाडीच्या हातात जातात, हे स्पष्ट होईल.