रत्नागिरीतील १९ हजार ६५४ शेतकऱ्यांना ई केवायसी करण्यासाठी ३१ ऑगस्टची डेडलाईन 

रत्नागिरी:- पी एम किसान निधी योजनेंतर्गत रत्नागिरी तालुक्यातील १९ हजार ६५४ शेतकर्‍यांनी ई केवायसी केलेली नाही. त्यांनी ३१ ऑगस्टपर्यंत ई केवायसी केली नाही, तर त्यांना पुढील लाभ दिले जाणार नाहीत असा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

केंद्र शासनाच्या पी एम किसान सन्मान योजनेतून शेतकर्‍यांना वर्षाला ६००० रुपये मिळत आहेत. या योजनेतून लाभार्थ्यांना अकरा हफ्ते मिळाले आहेत. पी एम किसान लाभार्थी यांच्या माहितीत काही त्रुटी असल्याने केंद्र शासनाने लाभार्थींना ई केवायसी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. केंद्र शासनाने ई केवायसी करण्याची मुदत ३१ जुलैपर्यत ठेवली होती. पण अद्यापही सर्व लाभार्थ्यांनी ई केवायसी न केल्याने आता ३१ ऑगस्ट ही ई केवायसी करण्याची अंतीम तारीख निश्चीत केली आहे. जे लाभार्थी ई केवायसी करणार नाहीत त्यांना या योजनेचा १२ वा हफ्ता मिळणार नाही. रत्नागिरी तालुक्यात पी एम किसानचे आधार पडताळणी झालेले २९ हजार ६५० लाभार्थी आहेत. त्यापैकी ८ हजार ३७८ लाभार्थींनी ई केवायसी केली. फकत  २८ टक्के लाभार्थ्यांनी ई केवायसी पुर्ण केले आहे. अद्यापही १९ हजार ६५४ लाभार्थी म्हणजेच ७२ टक्कें काम पूर्ण करावयाचे आहे. या लाभार्थीनी ३१ ऑगस्टपर्यंत ई केवायसी न केल्यास यांना पुढील लाभ दिला जाणार नाही. तालुक्यातील शेतकर्‍यांना ३ कोटी ९३ लाख रुपये मिळणार नाहीत. ई केवायसी केली नसलेल्या शेतकर्‍यांनी त्यांची यादी संबंधीत तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांना गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी तसेच गटविकास अधिकारी यांच्यामार्फत तालुक्यातील सर्व सरपंच यांना ईमेलने पाठवण्यात आली आहे. या शिवाय तालुक्यातील सर्व महा ई सेवा केंद्र चालकांकडेही यादी पाठवण्यात आली आहे.