रत्नागिरी /प्रणील पाटील:- शहरानजिकच्या उद्यमनगर एमआयडीसीतील स्टरलाईट कंपनीच्या ताब्यात असलेली सुमारे १ हजार २०० एकर जागा पुन्हा ताब्यात घेण्याची तयारी एमआयडीसीने सुरु केली आहे. नवे उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांच्या मतदार संघातील स्टरलाईटची जागा गेली तब्बल ५० वर्ष पडून आहे. मात्र ना.सामंत यांनी हि जागा एमआयडीसीकडे पुन्हा घेवून नवा प्रकल्प उभारण्याच्या हलचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे रत्नागिरीतील तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे.
स्टरलाईट कंपनीच्या अल्युुमिनियम प्रकल्पासाठी गेल्या ४२ वर्षांपूर्वी येथील ३०० शेतकर्यांची १२०० एकर जमिन एमआयडिसीने संपादन केली होती. जनविरोधाच्या रेट्यामुळे हा प्रकल्प रद्द झाला होता. प्रकल्पासाठी सर्वात कमी भावाने घेतलेली ही जमिन शेतकर्यांना अद्याप परत मिळालेली नाही.
रत्नागिरी एमआयडित स्टरलाईट कंपनीच्या अल्युमिनियम प्रकल्पासाठी सन १९७१‚७२ मध्ये रत्नागिरीतील ३०० शेतकऱ्यांची तब्बल १२०० एकर जमिन संपादित करण्यात आली. त्यासाठी शेतकऱ्यांच्या संपादीत जागेवर एमआयडिसीने बोजा लावला. १९८४ साली हा प्रकल्प प्रत्यक्षात उभा राहणार होता. मात्र या प्रदुषणकारी प्रकल्पाला त्यावेळी तीव्र विरोध झाला. प्रकल्पाविरोधात मोर्चे, आंदोलने झाली. त्यामुळे जनप्रक्षोभामुळेच कंपनीला प्रकल्प थांबवावा लागला होता.
स्टरलाईट कंपनी न्यायालयात गेल्याने जागेचा गुंता कायम आहे. मात्र कंपनी आजही जागेचा कर अद्यापही एमआयडीसीकडे भरणा करत आहे. यापुर्वी अनके वेळा एमआयडीसीने कंपनीला जागा परत करण्याबाबत नोटीसा बजावल्या होत्या. स्वत: कंपनी सुरु करा. अन्यथा जागा परत करा अशी सुचना एमआयडीसीने केली होती. तर दुसऱ्या बाजूला मूळ जागा मालकांनी पुन्हा जागा आमच्या ताब्यात द्या. अशी मागणी करत आहेत.
मात्र राज्याच्या मंत्रीमंडळात स्थानिक आमदार उदय सामंत यांच्याकडे राज्याच्या उद्योग विभागाची जबाबदारी आल्यानंतर पुन्हा एकदा स्टरलाईट कंपनीच्या जागेवर कंपनी उभारण्याच्या हलचाली सुरु झाल्या आहेत. कंपनीकडून ती जागा पुन्हा एमआयडीसीने ताब्यात घेवून त्याठिकाणी नवी कंपनी उभाण्याची तयारी सुरु झाली आहे.