Tuesday, June 23, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरीतील सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे

रत्नागिरीतील सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे

उद्यापासून कार्यालये गजबजणार!

रत्नागिरी:- गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण राज्यासह रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेला सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे घेण्यात आला आहे. राज्य सरकारसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर कर्मचारी समन्वय समितीने संप मागे घेण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे प्रशासकीय कोंडी फुटली आहे. रत्नागिरीतील हजारो कर्मचारी उद्यापासून पुन्हा आपल्या कर्तव्यावर हजर होणार आहेत.

जुनी पेन्शन योजना आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक झाले होते. रत्नागिरीत सलग चार दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. मात्र, राज्यस्तरावर मुख्यमंत्री आणि कर्मचारी संघटनांच्या नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेत मागण्यांबाबत सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर हा संप स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

संपाच्या चौथ्या दिवशीही रत्नागिरीतील तहसील कार्यालय, आरटीओ आणि जिल्हाधिकारी कार्यालयांत शुकशुकाट होता. सर्वसामान्यांची कामे खोळंबली होती. आता संप मागे घेतल्याने रखडलेली प्रशासकीय कामे, दाखले आणि इतर सेवा पुन्हा गतीने सुरू होतील. “आम्ही लोकशाही मार्गाने आमचे म्हणणे मांडले असून सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होईल, अशी आम्हाला खात्री आहे,” अशी भावना स्थानिक कर्मचारी नेत्यांनी व्यक्त केली.

गेल्या चार दिवसांपासून दाखल्यांसाठी आणि इतर कामांसाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवणाऱ्या नागरिकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. उद्यापासून सर्व कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू होणार असल्याने जनजीवन पुन्हा पूर्वपदावर येणार आहे.