रत्नागिरी:- जिल्ह्यात सध्या पावसाने चांगलाच जोर धरला आहे. यामुळे जिल्ह्याची पाणीटंचाई संपुष्टात आली आहे. रत्नागिरी शहरालासुद्धा पाणीपुरवठा करणारे शीळ धरण तुडुंब भरून वाहू लागल्याने शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे. शीळसह पानवल आणि कळझोंडी धरणही भरले आहे.
यावर्षी मोसमी पाऊस वातावरणीय प्रतिकूलतेने जिल्ह्यात दाखल होण्यास उशीर झाला. अडलेल्या स्थितीत असलेल्या मोसमी पावसाच्या सक्रियतेबाबत अडचणी झाल्या. अखेर जूनच्या तिसऱ्या आठवड्यात पाऊस सक्रिय झाला. पाऊस सक्रिय झाल्यानंतर पाच दिवसाच्या प्रवासाने आता पाणलोट क्षेत्रात सिंचनाला बळ मिळाले आहे. खालावलेल्या स्थितीत असलेल्या जिल्ह्यातील धरण क्षेत्रातील पाणलोट क्षेत्रात आता सिंचनाची टक्केवारी वाढू लागली आहे.
रत्नागिरीत गेल्या दीड ते दोन महिने शहराला दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होता. पाऊस लांबल्याने काही दिवसापूर्वी पाणीबाणीची वेळ रत्नागिरीकरांवर आली होती. परंतु गेल्या पाच दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने रत्नागिरी शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शीळ धरणातील पाणीसाठा वाढला आहे. शीळ धरण ओव्हरफ्लो झाल्याचे दिसत आहे. शहरवासीयांना आता मुबलक पाणी मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे चित्र दिसत आहे.