रत्नागिरीतील शासकीय दूध डेअरीला टाळे 

रत्नागिरी:- बाजारात दूधाचे दर गगणाला भिडलेले असताना शासकीय दूध डेअरीमार्फत अल्पदर दिला जात असल्याने जिल्ह्यातील सर्व दुग्ध संस्था खाजगी दूध डेअरीकडे वळल्या आहेत. त्यामुळे रत्नागिरीतील शासकीय दूध डेअरी अखेर बंद पडली आहे. बुधवारपासून दूध पुरवठा बंद झाल्याने दूध डेअरीला कुलूप लागण्याची वेळ आली आहे. मात्र याकडे सरकारचे पुर्णत: दुर्लक्ष झाले आहे. आज जनता दराबारासाठी रत्नागिरीत येणारे पालकमंत्री  ना.उदय सामंत दूध डेअरी बाबत काय निर्णय घेतात याकडे दूग्ध संस्थांचे लक्ष लागले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात दोन विभागात शासकीय दूध डेअरी कार्यरत होती. सर्वप्रथम रत्नागिरीतील उद्यमनगर एमआयडीसीत तर दुसरी चिपUूण येथे दूध डेअरीमार्फत हजारो लिटर दूध संकलन करुन त्याची जिल्ह्यात विक्री केली जात होती. उद्यमनगर येथील दूध डेअरीत हजारो लिटर दूधावर प्रक्रिया केली जात होती. मात्र कालांतराने त्यांना जागा अपूरी पडू लागल्यानंतर सन १९९०मध्ये मिरजोळे एमआयडीसीत नवी इमारत उभारुन तेथे नवी शासकीय दूध डेअरी सुरु करण्यात आली होती. तिथे हजारो लिटर दूध लांजा , राजापूर ,संगमेश्वर या तालुक्यातून संकलीत करुन त्यावर प्रक्रिया करुन रत्नागिरी शहरात तर काही प्रमाणात चिपळूण येथील डेअरीला पाठविण्यात येत होते. आज हिच दूध डेअरी बंद झाली आहे.गेल्या काही वर्षात पश्चिम महाराष्ट्रातील श्रीमंत दूग्ध संस्था दूध संकलनासाठी कोकणात उतरल्यानंतर त्यांनी शासकीय दूध डेअरीपेक्षा जास्त दर दूग्ध संस्थाना देवून त्यांना आपल्याकडे आकर्षित केले. पुर्वी रत्नागिरी शासकीय दूध डेअरीला ३३ संस्था दूध पुरवठा करत होत्या. जुलै महिन्यात त्यातील ३२ संस्थांनी कोल्हापूरातील दूध संस्थांना दूध पुरवठा सुरु केला. त्यानंतर लांजातील केवळ एक संस्था शासकीय दूध डेअरीला १४०० लिटर दूधाचा पुरवठा करत होती. त्यावर दूध डेअरी सुरु होती. मात्र खाजगी दूध डेअरी चालक लिटरला ३३ दर देत आहेत.तर शासकीय दूध  डेअरीतून केवळ २५ रु. दर लिटरला मिळत असल्याने एकमेव लांजातील संस्थेनेही दूध पुरवठा बंद करुन खाजगी दूध डेअरील दूध पुरवठा सुरु केला. त्यामुळे शासकीय दूध डेअरील होणारा दूध पुरवाठा बंद झाल्याने दूध डेअरी बंद करण्याची वेळ आली आहे.खाजगी डेअरीमार्फत दर दहा दिवसांनी दूधाचे पैसे दिले जातात. शासकीय दूध डेअरीमार्फत निधी आल्यानंतर संस्थांना पैसे दिले जातात. रत्नागिरीतील दूध डेअरीमार्फत ऑगस्टपासून सुमारे ३२ लाखांचे देणे एका दूध डेअरीचे असल्याने अखेर त्यांनी दूध पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेवून खाजगी दूध डेअरील दूध पुरवठा सुरु केल्याने शासकीय दूध डेअरी बंद झाली आहे.रत्नागिरी शासकीय दूध डेअरीत अधिकारी, कर्मचारी मिळुन ५५  पदे मंजूर आहेत. मात्र प्रत्यक्षात १४ कर्मचारी उपलब्ध असून एकाच व्यक्तीला अनेक भूमिका बजवाव्या लागत होत्या. तर तांत्रिक कर्मचार्यांची पदे गेली अनेक वर्ष रिक्त आहेत. एका बाजूल दु्ग्ध व्यावसायाला चालना देण्याच्या गप्पा मारणारे सरकार दुध डेअरी बाबात उदासिन असल्याचे चित्र आत स्पष्ट होवू लागले आहे.