रत्नागिरी:- रत्नागिरी – सिंधुदूर्गचे खासदार विनायक राऊत हे 2016 पासून रत्नागिरी विमानतळ सुरु होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. केंद्रीय मंत्री, विमान प्राधिकरणासोबत बैठका घेण्याबरोबरच यासाठी आवश्यक निधी मिळण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले आहेत. आता विमानतळावरुन लवकरच प्रवासी वाहतूकही सुरु होणार असल्याने, त्याचे श्रेय घेण्यासाठीच खोटेनाटे आरोप करण्यात येत आहे. माजी खा. निलेश राणे यांनी याचे फुकटचे श्रेय लाटू नये असा टोला शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी लगावला.
खा. विनायक राऊत यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख बंड्या साळवी, शहरप्रमुख बिपिन बंदरकर आदी उपस्थित होते. रत्नागिरी विमानतळ होण्यासाठी गेली 8 वर्षे खासदार विनायक राऊत सातत्याने प्रयत्न करत आहेत. तत्कालीन केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर, सुभाष भामरे, तटरक्षक दालाचे अधिकारी, संरक्षणमंत्रालय, एमआयडीसी, आदींच्या अधिकार्यांबरोबर बैठका घेतल्या. आता जमीन भूसंपादनाचा प्रश्न सुटल्यास हे विमातळ सुरू होण्यास सज्ज आहे. केंद्रीय मंत्री अशोक गजपती यांच्याबरोबर बैठक घेऊन रत्नागिरी विमानतळ आरसीएस उड्डाण योजनेअंतर्गत घेतले. याच्या विस्तारीकरणासाठी मुख्यमंत्र्यांनी 100 कोटी रुपयांची बजेट तरतूद केली आहे. रत्नागिरीत पर्यटन आणि उद्योगवाढीसाठी हे विमानतळ महत्वपूर्ण आहे. खा. विनायक राऊत आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत विमानतळ होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मंत्री उदय सामंत यांनी वारंवार तिवंदेवाडी आणि मिरजोळेतील ग्रामस्थांशी चर्चा करत आहेत. ग्रामस्थांचा याला विरोध नाही, परंतु त्यांना समाधनकारक मोबदला मिळावा, अशी त्यांची मागणी आहे. खासदार विनायक राऊत आणि मंत्री उदय सामंत यांनी लवकरच याबाबत बैठक घेऊन हा भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावले. त्यामुळे माजी खासदार नीलेश राणे यांनी श्रेय मिळवण्यासाठी खोटे आरोप करू नये, असे चाळके यांनी स्पष्ट केले.
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी रत्नागिरी विमानतळासाठी प्रयत्न केले हे निर्विवाद सत्य आहे. त्याबद्दल आमचा कोणताही आक्षेप नाही. त्या व्यक्तीबाबत आम्हाला नेहमीच आदर असल्याचे विलास चाळके यांनी सांगितले.