रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक 10 साठीचा प्रचार शुक्रवारी रात्री थंडावला. या प्रभागासाठी शनिवार 20 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल तर रत्नागिरी नगर परिषदेचा एकूण निकाल रविवार 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून जाहीर करण्यात येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा करण्यात आली होती. यात रत्नागिरीतील चार नगर परिषदा आणि तीन नगर पंचायतींचा समावेश आहे. यापूर्वी 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली मात्र तांत्रिक बाबींमुळे प्रभाग १० मधील निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. या वॉर्डात नगरध्यक्ष पदासाठी मतदान प्रक्रिया 2 डिसेंबर रोजी घेण्यात आली होती. आता शनिवारी या वॉर्डातील दोन नगरसेवक पदांसाठी मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
प्रभाग क्रमांक 10 मध्ये निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, १० डिसेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशीपासून युती-आघाडीचे उमेदवार आणि पदाधिकारी प्रचारात सक्रिय झाले. या प्रभागात महायुती विरुद्ध उबाठा अशी थेट लढत आहे. महायुतीतील भाजपचे उमेदवार राजू तोडणकर आणि मानसी करमरकर हे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत तर उबाठा कडून राजाराम रहाटे आणि श्वेता कोरगावकर निवडणूक आखाड्यात आहेत.
प्रभाग १० हा पारंपरिक भाजपचा मतदारसंघ आहे. त्यामुळे भाजपने आणि तेथील उमेदवारांनी हा प्रभाग आजही बांधून ठेवला आहे. त्यात एकाच प्रभागात प्रचार करण्याची त्यांना पुन्हा संधी मिळाली आहे. १ डिसेंबरपूर्वीचे वीस दिवस आणि आताचे पंधरा दिवस प्रचारासाठी मिळाल्याने निवडणूक रंगतदार होणार आहे. रत्नागिरी प्रभाग क्र. १० मधील अपक्ष उमेदवार सचिन शिंदे आणि संपदा रसाळ-राणा या दोघांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तसेच जिल्हा न्यायालयाकडूनही अवैध ठरवण्यात आले होते.









